
महाडमध्ये ७३ ग्रामपंचायतींमध्ये उपसरपंच विराजमान
महाड, ता. २ (बातमीदार) : तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांची सोमवारी निवड करण्यात आली. सरपंचपदाची निवड थेट पद्धतीने यापूर्वी झाली आहे. त्यामुळे सरपंचांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदाची निवडणूक पार पडली.
तालुक्यातील स्थानिक ग्रामपंचायतींमध्ये सकाळपासूनच कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. उपसरपंचपदी निवड होताच अनेक कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करण्यासाठी फटाक्यांची आतषबाजी देखील केली.
तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतींपैकी २२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे उर्वरित ४८ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक तर तीन ग्रामपंचायतींमध्ये काही प्रभागांकरिता निवडणूक घेण्यात आली.
तालुक्यातील फाळकेवाडी व कुंबळे या ग्रामपंचायतीमध्ये आरक्षित प्रवर्गाचा सरपंच उमेदवार उपलब्ध न झाल्याने ही दोन्ही पदे रिक्त होती त्यामुळे या ठिकाणी मंडल अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवडणूक झाली. काही ग्रामपंचायतीमध्ये सकाळी ११ वाजता तर काही ठिकाणी दुपारी दोन वाजता अर्ज दाखल करून घेण्यात आले. अनेक ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच पदाची निवड बिनविरोध झाली तर काही ठिकाणी गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले.
महाड औद्योगिक क्षेत्रामधील नडगाव, कांबळे ,सवाणे तसेच महाड तालुक्यातील दासगाव, करंजखोल येथील उपसरपंचपदाच्या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले होते. तालुक्यामध्ये सर्व ग्रामपंचायतच्या ठिकाणी उपसरपंचपदाची निवडणूक शांततेत पार पडली.
महाड ः दासगावच्या उपसरपंचपदी तेजस मिंडे यांची निवड झाली.