तीळावर महागाईची संक्रांत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तीळावर महागाईची संक्रांत
तीळावर महागाईची संक्रांत

तीळावर महागाईची संक्रांत

sakal_logo
By

महाड, ता. ११ (बातमीदार)ः मकर संक्रांतीला सूर्याचे उत्तरायण सुरू होते. या काळात थंडी अधिक असल्याने तीळ आणि गुळाचे सेवन केले जाते. यामुळे शरीराला अपेक्षित ऊर्जा मिळून त्वचेला टवटवीतपणा येतो. संक्रांतीला घरोघरी तिळगूळ वाटून आनंद साजरा केला जातो. मात्र यंदा तिळाचे भाव वाढल्‍याने गृहिणींमध्ये नाराजी आहे.
काही वर्षांपासून तिळाचे उत्पादन घटले असून नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे. महिनाभरापूर्वी २०० रुपये किलोच्या आसपास असलेले तीति ऐन संक्रांतीत २६० रुपये किलो झाल्याने तिळगुळासाठी गृहिणींना हात आखडता घ्यावा लागला आहे. गुळाचे भाव मात्र स्‍थिर असले तरीही तिळाच्या भाववाढीमुळे तिळाच्या रेडिमेड वड्या, लाडू, पोळ्यांच्या किमतीही वाढल्‍या आहेत.
मागील वीस दिवसांत तिळाच्या दरात तब्बल ६० रुपयांची वाढ झाली आहे;‎ तर तिळगुळाच्या लाडूचे २०० ग्रॅमचे एक पाकीट ६० ते १०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. स्‍वयंरोजगार करणाऱ्या‌या महिला, बचतगटांकडून सध्या तिळगुळाचे लाडू तयार करण्यात येत आहेत. मात्र किलोमागे लाडवाचे दरही १०० ते १५० रुपयांनी वाढले आहेत.

आरोग्‍यवर्धक तीळ
तिळामधील कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, फायबर्स, पॉलिसॅच्युरेटेड, ओमेगा ६ हे शरीरासाठी अत्यंत पोषक आहेत. त्यामुळे हृदयापासून त्वचेपर्यंतच्या अनेक रोगांमध्ये तिळाला महत्त्व आहे.
रक्तदाब, दात मजबूत होणे, केसांना मजबुती, हाडांना मजबुती, कानदुखी, चेहरा मुलायम ठेवणे, डोकेदुखी, शरीरातील अतिरिक्त चरबी अशा अनेक गोष्टींवर तीळ व त्याचे तेल उपयुक्त आहे.

तीळ शेती कमी झाल्याने मागणी जास्त व पुरवठा कमी अशी स्थिती सध्या आहे. तसेच हवामान बदलाचाही फटका तिळाच्या उत्‍पादनाला बसला आहे. त्‍यामुळे तिळाचे भाव वाढले आहेत.
- डी. एस. सावंत, व्यापारी

तीळ, गुळाच्या विक्रीवर परिणाम
पूर्वीच्या तुलनेत आता ग्राहक तिळगुळाच्या लाडवासाठी लागणारी सामग्री कमीच खरेदी करतात. नोकरदार महिला वर्ग तिळाचे लाडू घरी करण्यापेक्षा रेडिमेड लाडवांना पसंती देतात. त्यामुळे तयार लाडूंना अधिक मागणी आहे. गूळपोळी, पुरणपोळी आदी पदार्थ बनवण्यासाठी पुरेसे कामगार मिळत नाहीत. त्यामुळे मागणीनुसार पुरवठा करण्यात अडचणी येत असल्‍याचे विक्रेत्‍या महिलेने सांगितले.

असे वाढले दर
पदार्थ गत वर्षी यंदा
तिळाचे लाडू २०० २४० - २५० रु.
तीळ २०० २२० ते २६० रु.
चिक्कीचा गूळ ६० ते ६५ रु. ७५ रु.
तिळाच्या वड्या २०० रु. २६० रु.
तिळाचा हलवा १२० रु. १५० रु.
(भाव किलोचे)