निर्माल्य द्या, कंपोस्ट खत घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निर्माल्य द्या, कंपोस्ट खत घ्या
निर्माल्य द्या, कंपोस्ट खत घ्या

निर्माल्य द्या, कंपोस्ट खत घ्या

sakal_logo
By

महाड, ता. १२ (बातमीदार) : पूजा-अर्चा केल्यानंतर निर्माल्याचे काय करायचे हा प्रश्न सर्वांपुढे असतो. परंतु आचळोली येथील कृषी महाविद्यालयाने ‘निर्माल्य द्या,कंपोस्‍ट खत घ्या’ असा उपक्रम गणेशोत्सवात राबवला होता. निर्माल्य कचरा कुंडीत फेकून न देता एकत्र करून ठेवा, तुमच्या सवडीने ते आमच्याकडे जमा करा आणि संक्रांतीच्या दिवशी आमच्याकडून अंगणातील रोपांसाठी कंपोस्ट खत घेऊन जा, असे आवाहन महाविद्यालयाने केले होते. या आवाहनाला महाडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. निर्माल्यावर प्रक्रिया करून तयार झालेले कंपोस्ट खत आता महाडकरांसाठी मकर संक्रांतीला विशेष भेट म्हणून देण्यात येणार आहे.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ-दापोली संलग्‍न आचळोलीतील कृषी महाविद्यालय आणि महाड नगरपरिषदेच्या संयुक्त विद्यमाने ही पर्यावरण पूरक संकल्पना गणेशोत्सवादरम्यान राबवण्यात आली. निर्माल्यापासून कंपोस्ट खत निर्मिती करण्यात आली असून मकर संक्रांतीला तीळगूळ देण्यासाठी येणाऱ्यांना कंपोस्ट खत भेट म्हणून दिले जाणार आहे.
घराच्या बाल्कनी, टेरेसवरील कुंड्या किंवा अंगणातील झाडांना हे सेंद्रिय खत टाकून निसर्ग देवतेला स्मरण्याचे आवाहन कृषी महाविद्यालयाने केले आहे. घनकचरा निर्मूलन, विलगिकरणाची सवय लागणे आणि आपल्याच घरातील कुंडीत फळभाजी, पालेभाजी पिकवण्याचा आनंद नागरिकांना मिळावा, असा उपक्रमाचा उद्देश आहे. प्रा. डॉ. वैभव गिम्हवणेकर यांच्यासह उद्यानविद्या विभाग आणि कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी निर्माल्यावर प्रक्रिया करून तयार केलेले कंपोस्ट खत महाडचे तहसीलदार सुरेश काशीद, मुख्याधिकारी महादेव रोडगे, तालुका कृषी अधिकारी एल. जी. कोतवाल यांच्या उपस्‍थितीत भेट म्हणून दिले.

नागरिक निसर्ग संवर्धनाबाबत जागरूक होत असून शेकडो कुटुंब या माध्यमातून कृषी महाविद्यालयाशी जोडली गेली आहेत. निर्माल्यापासून तयार केलेले कंपोस्ट खत रोपांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरते. किमान तीन-चार महिन्यात हे खत तयार होते. या अनुषंगाने अभिनव आणि पर्यावरणपूरक उपक्रमात निसर्गप्रेमी बहुसंख्येने सहभागी झाले होते.
- डॉ. वैभव गिम्हवणेकर, कृषी महाविद्यालय, आचळोली

महाड ः सेंद्रिय खत मुख्याधिकारी महादेव रोडगे यांना देण्यात आले.