महाडमधील मल्लक स्पेशलिटी कंपनीला आग

महाडमधील मल्लक स्पेशलिटी कंपनीला आग

Published on

महाड, ता. ८ (बातमीदार) : महाड औद्योगिक क्षेत्रातील मल्लक स्पेशलिटी कंपनीमध्ये आज (ता. ८) रिॲक्टरचा स्फोट झाल्याने भीषण आग लागली. या दुर्घटनेमध्ये मल्लक कंपनीतील व शेजारच्या दोन कंपन्यांतील १३ जण किरकोळ जखमी झाले. या स्फोटाच्या आवाजाने पाच किलोमीटर परिसरातील गावेदेखील हादरली होती. या स्फोटातून उडालेले लोखंडी तुकडेदेखील परिसरातील गावात पडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

महाड औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट नंबर सी १०३ मध्ये मल्लक स्पेशलिटी कंपनीमध्ये पिगमेंट बनवण्यात येते. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कंपनीतील एथिलीन ऑक्साईड बनवणाऱ्या प्लांटमधील रिॲक्टरमध्ये अचानक स्फोट झाल्याने कंपनीमध्ये आग पसरली. या आगीचा धूर मोठ्या प्रमाणात पसरल्याने आगीची तीव्रता समजू शकत नव्हती. कंपनीमध्ये आग लागताच धोक्याची सूचना मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडत सुरक्षित स्थळ गाठले. औद्योगिक क्षेत्रातील अग्निशमन दल, विविध कंपन्यांमध्ये सुरक्षा अधिकारी, तसेच औद्योगिक क्षेत्रातील मार्कच्या सदस्यांनी आग विझवण्यासाठी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या स्फोटात कंपनीची इमारत पूर्णपणे ढासळून गेली. या इमारतीचेच तुकडे परिसरात उडाले.

कंपनी परिसरात असलेल्या प्रीव्ही, श्रीहरी आणि सिद्धार्थ या कंपन्यांच्या खिडक्यांची तावदाने तुटली; तर रिअॅक्टरसह अन्य लोखंडी तुकडे सुमारे दोन किलोमीटर अंतरापर्यंत उडाले होते. स्फोटानंतर कंपनीतील आग आणखीनच भडकली आणि कंपनीच्या अन्य दोन प्लांटला आगीने विळखा घातला. या दुर्घटनेत कंपनीतील मालमत्तेच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

तीन तासानंतर आगीवर नियंत्रण
महाड औद्योगिक पोलिस ठाण्याचे कर्मचारी, प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसीलदार सुरेश काशीद, नायब तहसीलदार प्रदीप कुडाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. या कंपनीशेजारी अनेक कारखाने असल्याने आग पसरू नये, यासाठी अग्निशमन दलाचे कर्मचारी प्रयत्न करत होते. तीन तासांचा प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. स्फोट झाल्यानंतर झालेल्या धावपळीत कंपनीच्या सुरक्षा विभागाचे कामगार आणि शेजारील कंपन्यांमधील १३ कामगार किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.