
दुखवटाच्या रकमेतून वाचनालयासाठी मदत
महाड, ता. १२ (बातमीदार) : सोशल मीडियामुळे सध्याची पिढी वाचन संस्कृतीपासून दुरावत असल्याचे ओरड नेहमीच होते. या पिढीला पुन्हा एकदा वाचनालयाची ओढ लागावी, या उद्देशाने महाड तालुक्यातील पारमाची येथील उद्योजक अनिल मालुसरे यांनी वरंध येथील रायगड शिक्षण प्रसारक मंडळाच्या छत्रपती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास सुमारे सव्वा लाख रुपयांची देणगी दिली.
काही महिन्यापूर्वी अनिल मालुसरे यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने निधन झाले होते. त्यांच्या कार्याप्रसंगी समाज बांधवांनी दुखवटा म्हणून गोळा केलेल्या निधीत अधिक भर घालून अनिल मालुसरे व त्यांचे बंधू राकेश यांनी आपण ज्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले त्या शाळेत वाचनालय अद्ययावत करण्याच्या उद्देशाने ही देणगी देण्याचा निर्णय घेतला. रायगड शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष हनुमंत जगताप यांसह महाडच्या माजी सभापती सपना मालुसरे, वरंधचे सरपंच जयवंत देशमुख, शाळेचे सभापती शहाजी देशमुख, संस्थेचे विश्वस्त महेंद्र पाटेकर, राजेंद्र कोरपे, मुख्याध्यापक नितीन माळवदे यांसह परिसरातील औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्यांचे अधिकारी त्यांच्या उपस्थिती वाचनालयासाठी देणगी देण्यात आली.