
महिलेचे शोषण करणाऱ्या आरोपीला दहा वर्षाची सक्त मजुरी
महाड, ता. १५ (बातमीदार) : लग्नाचे प्रलोभन दाखवून विधवा महिलेचे शोषण करणाऱ्या व त्यातून जन्माला आलेल्या बाळाचा स्वीकार करण्यास नकार देणाऱ्या आरोपीला माणगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने दहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.
महाड तालुक्यातील वाकी या ठिकाणी २०१५ मध्ये ही घटना घडली होती. संजय राजाराम कदम असे आरोपीचे नाव असून त्याने पीडित महिलेला लग्नाचे प्रलोभन दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. यातूनच ही महिला गर्भवती राहिली व तिने एका बाळाला जन्म दिला; परंतु यानंतर या बाळाचा स्वीकार करण्यास व लग्न करण्यास नकार देत संजय कदम यांनी हे बाळ आपले आहे असे सांगितल्यास पीडित महिलेला ठार मारण्याची धमकीदेखील दिली होती. या महिलेने महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानुसार तत्कालीन पोलिस निरीक्षक एन. डी. सस्ते यांनी याबाबत तपास करून आरोपपत्र माणगाव सत्र न्यायालयात दाखल केले होते. माणगाव येथील न्यायालयामध्ये या खटल्याची सुनावणी सुरू होती. या खटल्यामध्ये पीडित महिलेची साक्ष व डीएनए अहवाल महत्त्वाचा ठरला. या खटल्यात जितेंद्र म्हात्रे यांनी सरकारी पक्षाच्यावतीने काम पाहिले. माणगाव न्यायालयाचे विशेष सत्र न्यायाधीश हर्षल भालेराव यांनी या घटनेतील गुन्ह्याच्या सुनावणीनंतर आरोपी संजय राजाराम कदम याला दोषी ठरवून १४ फेब्रुवारीला दहा वर्षे सक्त मजुरी व साठ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.