
मढेघाट पायथ्याजवळ बारव दीपोत्सव
मढेघाट पायथ्याजवळ बारव दीपोत्सव
महाड, ता. २१ (बातमीदार) : अखिल महाराष्ट्र बारव मोहीम अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात महाशिवरात्रीनिमित्ताने बारव दीपोत्सव साजरा केला गेला. या आवाहनाला प्रतिसाद देत साद सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे मढेघाटाच्या पायथ्याशी असलेल्या महाड तालुक्यातील रानवडी पडवळ कोंड या ठिकाणी महाशिवरात्री दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाल्याने बारव आणि परिसराचे वातावरणात चैतन्यपूर्ण झाले होते.
महाराष्ट्रात साद सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे ऐतिहासिक बारव स्वच्छता व संवर्धन मोहीम राबवली जात आहे. दुर्गम भागात दडलेल्या नष्ट होत चाललेल्या बारवांचा शोध घेऊन त्यांना प्रकाशात आणण्याचे काम केले जात आहे. यापुढे जात संस्थेकडून महाशिवरात्रीनिमित्ताने बारव दीपोत्सव साजरा केला गेला. या ऐतिहासिक बारव दिव्यांनी प्रकाशमय केल्या गेल्या. मढेघाट पायथ्याशी असलेली बारवही या दिवशी तेजोमय झाली. मनोज गुळंबे, निखिल पडवळ, सार्थक पडवळ, ध्रुव पडवळ, रूपेश होगाडे, स्वप्नील होगाडे, संकेत पडवळ, आनंद सकपाळ, युगराज गोरीवले, हर्शल कांबळे यांनी बारव परिसर साफ करून दीपोत्सव कार्यक्रमाची पूर्वतयारी केली. सायंकाळी ७ वाजता सर्व दिवे आणि मशाली प्रज्वलित करण्यात आल्या.