शासकीय कामांचा खोळंबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शासकीय कामांचा खोळंबा
शासकीय कामांचा खोळंबा

शासकीय कामांचा खोळंबा

sakal_logo
By

महाड, ता. १४ (बातमीदार): शहराचा वाढता विस्तार व सरकारी कार्यालयांना जाणवणारी जागेची कमतरतेचा विचार करता महाडमध्ये आता प्रशासकीय इमारतीची गरज आहे. विशेष म्हणजे, यासाठी जागा उपलब्ध असूनही कामाला गती मिळालेली नाही. त्यामुळे दुर्गम तालुका असलेल्या महाडमध्ये शासकीय कामांचा खोळंबा पहावयास मिळत आहे.
दुर्गम तालुका असलेल्या महाड क्षेत्रफळाने विस्तारलेला तालुका आहे. महाडमध्ये औद्योगिक क्षेत्र असल्याने याठिकाणी शहर व परिसराचा विकासही झपाट्याने होत आहे. महाडला स्वतःची ऐतिहासिक ओळख आहे. रायगड किल्ल्याबरोबरच ऐतिहासिक स्थळे व जुनी बाजारपेठ पर्यटकांची वर्दळ असते. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचा तालुका असल्याने राज्य व केंद्र सरकारची अनेक महत्त्वाची कार्यालये आहेत. काही कार्यालये ही उपविभागीय कार्यालय दर्जाची आहेत. तर महाडमध्ये तहसील कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय, पोलिस ठाणे, नगरपालिका,पंचायत समिती, पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग, राज्य उत्पादन शुल्क, भूमिअभिलेख अशा कार्यालयांना स्वतःच्या इमारती आहेत. परंतु, ही सर्व कार्यालये शहरातील विविध भागांमध्ये वसलेली आहेत. याव्यतिरिक्त उपविभागीय कृषी कार्यालय, सामाजिक वनीकरण, तालुका सहाय्यक निबंध, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वैधमापन शास्त्र,केंद्रीय उत्पादन शुल्क ,बीएसएनएल, टपाल कार्यालय, तालुका कृषी कार्यालय भाडेतत्त्वावर शहरात कार्यरत आहेत. त्यामुळे भाड्यापोटी दर महिन्याला सरकारचे लाखो रुपयेही वाया जात आहेत.
-----------------------------------
अन्य कार्यालयांचे काय ?
महाडलाही प्रशासकीय इमारत व्हावी अशी अनेक वर्षांपासून नागरिकांची मागणीही होती. अखेर पाठपुराव्यानंतर जलसंपदा विभागाची काही जागा या इमारतीसाठी देण्याचा निर्णयही झाला. बांधकामाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. बांधकाम विभागाकडून इमारत बांधकामाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरु आहे. या इमारतीत तहसील कार्यालय व प्रांताधिकारी कार्यालय ही दोनच कार्यालये असणार आहेत. त्यामुळे अन्य कार्यालयांच्या जागेचा प्रश्न कायमच आहे.
.....................
प्रशासकीय कार्यालयासाठी आवश्यक असणारी जागा ताब्यात घेण्यात आली आहे. पुढील बांधकामाचे प्रत्यक्ष काम बांधकाम विभागाकडून केले जाणार आहे.
-सुरेश काशीद, तहसीलदार, महाड
-------------------------------
इमारतीसाठी जागेची उपलब्धता झाली असल्याने अंदाजपत्रक बनवण्याचे काम सुरु आहे.
-शिवलिंग उल्लागडे, उप-अभियंता, सा.बां. विभाग, महाड
.................
केवळ महसूल नव्हे तर अन्य भाड्याच्या इमारतीमधील कार्यालये एकत्र करून प्रशासकीय भवन बांधल्यास नागरिकांचा फायदा होईल.
- रूपेश सावंत, नागरिक