कुर्डुगडाला नवसंजीवनी

कुर्डुगडाला नवसंजीवनी

Published on

सुनील पाटकर, महाड
इतिहासाचे साक्षीदार असलेल्या गडकिल्ले; तसेच विविध ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन करण्यासाठी अनेक तरुण आणि संस्था पुढे येत आहेत. यातूनच या तरुणांमध्ये इतिहास व संस्कृतीविषयी असलेली कणव दिसून येते. जिल्ह्यातील आम्ही सह्याद्रीचे शिलेदार ही सामाजिक संस्था (रायगड) अशा विविध मोहिमा राबवत असते. सह्याद्रीच्या या शिलेदारांनी माणगाव तालुक्यातील कुर्डुगड या किल्ल्यावर श्रमदान मोहीम राबवून गडाला नवसंजीवनी देण्याचे काम केले.

पुण्याहून कोकणात उतरणाऱ्या ताम्हणी घाटाच्या वेशीवरच हा किल्ला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी कुर्डाई देवीचे मंदिर आहे. ताम्हिणी घाटाच्या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी कुर्डुगड (विश्रामगड) हा किल्ला बांधण्यात आला होता. याच गडावर जाणाऱ्या वाटा, पायऱ्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. काही ठिकाणी जोत्याचे अवशेष आढळतात. ही बाब आम्ही सह्याद्रीचे शिलेदार या संस्थेच्या सदस्यांच्या लक्षात येताच त्यांनी या गडावर स्वच्छता व संवर्धन मोहीम राबवण्याचे ठरवले. त्यानुसार
२ एप्रिलला हा कार्यक्रम ठरला. मोहिमेत सहभागी झालेल्या शिलेदारांना मोहिमेचे स्वरूप सांगून प्रत्येक काम विभागून देण्यात आले. त्यानुसार मोहीम सुरू झाली. या मोहिमेत माणगाव तालुक्यातील होडगाव, पाचोळे, सुरव, खरवली, बोर्ले, नागाव, नवघर, निजामपूर, बामणोली, डोंगरोली गावांतील तरुणांनीही आवडीने सहभाग घेतला. गडाच्या मुख्य प्रवेशद्वारातील कातळात कोरलेला पायरी मार्ग आहे. हा मार्ग मातीत लुप्त होण्याच्या मार्गावर होता. हा सर्व मार्ग स्वच्छ करण्यात आल्याने गडाने मोकळा श्वास घेतला.
अतिवृष्टीमुळे गडावर जाणारी पायवाट काही ठिकाणी ढासळल्याने गडावर जाता येत नव्हते. यातून तात्पुरती वाट करण्यात आली आहे. रगावर एक मीटर उंचीची हनुमान मूर्ती असून मूर्तीच्या पुढे सुमारे १५० माणसे बसू शकतील, अशी निसर्गनिर्मित घळ आहे. या हनुमान मूर्ती शेजारील जोत्यांचे अवशेष दरड कोसळून, मातीत दिसेनासे झाले होते. त्यांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न संस्थेमार्फत करण्यात आला. दक्षिणेकडील बुरुजाजवळील जोत्यांचे अवशेष दगड कोसळून अस्ताव्यस्त झाले होते. या ठिकाणी दगड व्यवस्थित लावून रचण्यात आले. गडावरील वाढलेले गवत साफ करण्यात आले.
........
असा आहे कुर्डुगड
कुर्डुगड हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. माणगाव तालुक्याच्या ईशान्येस सुमारे २१ कि.मी. अंतरावर सुमारे ६१० मीटर उंच सुळक्यावर हा किल्ला आहे. किल्ल्यातच दोन भलेमोठे सुळके आहेत. सह्याद्री डोंगररांगांमुळे महाराष्ट्र कोकण किनारपट्टी, सह्याद्रीची रांग व घाटमाथा असा विभागला आहे. अशा विविध घाटमार्गांनी घाटमाथ्यावरील माल कोकणात येत असे. ताम्हणी घाटही असाच व्यापारी मार्ग होता. या व्यापारी मार्गांचे रक्षण करण्यासाठी कुर्डुगड हा किल्ला बांधण्यात आला होता.
............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com