पुस्‍तक बाग

पुस्‍तक बाग

सुनील पाटकर, महाड
इथे यायचे आणि मनसोक्त खेळायचे, बागेत बसून पुस्तके वाचायची, मजा मस्ती करायची, गाणी आणि भटकंतीही करायची. महाडच्या हुतात्मा स्मारकामध्ये सध्या मुलांचे विश्व अगदी आनंददायी बनले आहे. अभ्यासाच्या ओझ्यातून मुक्त झालेली बच्चे कंपनी सुटीचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी पुस्तक बागेत रमली आहे. महाडमध्ये तब्बल तीस वर्षे सुरू असणाऱ्या पुस्तक बागेने बिनभिंतीच्या शाळांमधून अनेक मुले विविध आव्हाने पेलण्यासाठी तयार केली आहेत.
वाचन संस्कृती वाढावी, लहानपणापासूनच मुलांना विविध पुस्तकांची आवड निर्माण व्हावी, खेळ आणि विविध उपक्रमातून वाचनाची आवड जपली जावी, यासाठी महाडमध्ये पर्यावरणाची पुस्तकबाग हा उपक्रम अनेक वर्ष सुटीमध्ये राबवला जातो. येथील रंगसुगंध संस्था, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच शशिकला सावंत स्मारक वाचन मंदिर यांच्यातर्फे राबवल्या जाणाऱ्या उपक्रमात दररोज जवळपास ३०० हून अधिक मुले पुस्तक बागेत येतात. रंग सुगंधचे अध्यक्ष सुधीर शेठ यांच्या संकल्पनेतून ही पुस्तकबाग सुरू राहिली आहे. या पुस्तक बागेत लहान मुलांना आवडणारी अनेक इंग्रजी व मराठी पुस्तके ठेवली जातात. एकाच ठिकाणी पुस्तक वाचण्याची सवय कंटाळवाणी होत असल्याने हुतात्मा स्मारकाच्या बागेमध्ये, निसर्गरम्य वातावरणात, बाकड्यांवर अथवा खाली बसून लहान मुले या पुस्तक वाचतात, कविता म्हणतात आणि चार भिंतीच्या पलीकडे असणारी बिनभिंतीची शाळा मुले मनसोक्त अनुभवतात.
पुस्तक बागेत या मुलांकरिता भटकंतीही ठेवली जाते. याशिवाय स्लाईड शो, ओरोगामी, विविध खेळ, चित्रकला, कथाकथन, रांगोळी कॅलिग्राफी, पर्यावरण जागृती, मनोरंजनात्मक खेळ, विविध प्रकारच्या स्पर्धा अशी भरपूर साधने मुलांच्या मनोरंजनासाठी तयार करण्यात आली आहेत. या ठिकाणी मुलांना पारंपरिक खेळाची ओळख होते, नव्या जुन्या साहित्यिकांची माहिती होते, आपल्यातील कला गुण कोणत्याही दडपणाशिवाय प्रकट करता येतात. नवीन मित्र मिळतात आणि अनुभवाची एक वेगळी शिदोरी लहानपणापासूनच मुलांजवळ जमा होते. तीस वर्षे हजारो मुले या पुस्तक बागेतून शिकून मोठी झाली आहेत. त्‍यांच्या ज्ञानसंपदेत भर पडली आहे.
पुस्तक बागेचे काम कोरोना काळ वगळता तीस वर्षे अविरतपणे सुरू आहे आणि ते देखील विनाशुल्‍क. सकाळी नऊ ते साडेअकरा व सायंकाळी चार ते साडेसहा या वेळात बाग मुलांनी गजबजलेली असते. दरवर्षी उन्हाळी सुट्टी पडली की पुस्तक बाग बच्चे कंपनीला खुणावते, आणि मुलांची पावले बागेकडे आपोआपच वळतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com