दासगाव मध्ये  पाणी टंचाईची सुरुवात, विहिरी व नद्यांनी गाठला तळ

दासगाव मध्ये पाणी टंचाईची सुरुवात, विहिरी व नद्यांनी गाठला तळ

दासगावमध्ये विहिरी, नद्यांनी गाठला तळ
कोतुर्डे धरणातील नळपाणी योजनाही बंद
महाड, ता. २ (बातमीदार) : तालुक्यातील दासगाव गावामध्ये बारमाही पाणी उपलब्ध असणाऱ्या विहिरी व विंधन विहिरी यंदा लवकर कोरड्या पडल्‍या आहेत. त्‍यात पाऊस सुरू होण्यास अजून दीड महिना बाकी असल्याने दासगावला पाणीटंचाईची तीव्र झळ पोहचण्याची शक्यता आहे.
कोतुर्डे धरणाच्या पाण्यावर दासगावमध्ये नळ पाणी पुरवठा योजना राबवली गेली आहे. या धरणातून जे पाणी सोडले जाते, तेथे महामार्गालगत असलेल्या जॅकवेलने दासगावमध्ये पाणी पुरवठा केला जातो. या जॅकवेलच्या ठिकाणी वरून वाहत येणाऱ्या पाण्याला अडवण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत एक बंधारा बांधला गेला असला तरी दरवर्षी बंधाऱ्यातील पाणी खराब होत असल्याने त्‍याचा पिण्यासाठी उपयोग होत नाही. गेली काही वर्षे कोतुर्डे धरणाच्या पातळी कमी झाल्‍याने नळ पाणी पुरवठा योजना एप्रिलपासूनच बंद पडते. अशा वेळी दासगावमध्ये असलेल्या विहिरी आणि खासगी विंधन विहिरीमधून मिळणाऱ्या पाण्याचा साठा ग्रामस्थांना पुरेसा होतो. अनेक वर्षे दासगावमधील विहिरी पाऊस पडेपर्यंत भरलेल्या असायच्या, परंतु यंदा अनेक विहिरी एप्रिलमध्येच कोरड्या पडल्‍या आहेत, तर अनेक खासगी विंधन विहिरीही कोरड्या झाल्या आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली. सध्या नागरिकांना पिण्यासाठी टँकरचे पाणी विकत घ्यावे लागते. पावसाळा सुरू होण्यास जवळपास दीड महिना असल्‍याने दासगावमधील नागरिकांना पाणीटंचाई सहन करावी लागणार आहे.

...................

खोपोलीत पाणीटंचाई वाढली
पाणी गळतीकडे पालिकेचे दुर्लक्ष

खोपोली, ता. २ (बातमीदार) ः शहरातील उंचावरील असलेली लोकवस्ती तसेच दूरवरच्या अनेक रहिवासी भागांत गेल्‍या अनेक दिवसांपासून अनियमित पाणी पुरवठा होत आहे. याबाबत केलेल्‍या तक्रारींकडेही पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून शहरातील पाणी गळती रोखल्‍यासही, काही भागांना पुरेसा पाणीपुरवठा होऊ शकेल, असे नागरिकांचे म्‍हणणे आहे.
शहरातील विणानगर, आशियाना इस्टेट, ड्रीमलँड, काटरंग, मोगलवाडी, शीळफाट, यशवंतनगर, लौजी व अन्य रहिवासी भागात मार्च महिन्यापासून पाणीटंचाई सुरू आहे. एप्रिल महिन्यात बोअरिंग आटल्याने ही टंचाई अधिकच जाणवते. त्यात पालिकेकडून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून एकीकडे पाणीटंचाई तर दुसरीकडे गळतीने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने नागरिकांत पालिका कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे.

३५ टक्‍क शुद्ध पाणी वाया
दोन वर्षांपूर्वी पालिकेने केलेल्या पाणीऑडिट अहवालानुसार, खोपोली पाणीपुरवठा यंत्रणेतून एकंदरीत ३५ टक्के शुद्ध केलेले पाणी गळतीमुळे वाया जात आहे. ही गळती १० टक्‍क्‍यांपेक्षा कमी होऊ शकते. त्‍यासाठी योग्‍य नियोजनाची गरज आहे. मात्र याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्‍याचे विणानगर येथील रहिवासी मिलिंद चव्हाण यांनी सांगितले.

गळती रोखण्यासाठी विशेष पथक कार्यान्वित आहे. नागरिकांनी सूचना किंवा लक्षात आणून दिल्यास अधिक परिणामकारक सुधारणा होतील.
- विनय शिपाई, वरिष्ठ अभियंता, पाणीपुरवठा विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com