शिवराज्याभिषेकदिन सोहळ्यासाठी गड सजला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवराज्याभिषेकदिन सोहळ्यासाठी गड सजला
शिवराज्याभिषेकदिन सोहळ्यासाठी गड सजला

शिवराज्याभिषेकदिन सोहळ्यासाठी गड सजला

sakal_logo
By

महाड, ता. ३१ (बातमीदार) : शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप या ओळींची आठवण करून देणारा किल्ले रायगड गेल्‍या काही दिवसांपासून गजबजला आहे. याच रायगडच्या मातीने छत्रपती शिवरायांचा शिवराज्याभिषेक सोहळा अनुभवला होता, आता पुन्हा छत्रपती शिवरायांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या सोहळ्याची जोरदार तयारी किल्‍ल्‍यावर सुरू आहे.
ज्या ठिकाणी राज्याभिषेक पार पडला तो राजदरबार शिवकालीन बाजाने सजवला जात आहे. गडावरील बाजारपेठ, होळीच्या माळावर देखावे उभारण्यात येत आहेत. शिवप्रेमींची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाची लगबग सुरू आहे.

रायगडावर दोन जूनला तिथीनुसार तर सहा जूनला तारखेनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळा पार पडणार आहे. या वर्षी राज्‍य सरकारकडून सोहळ्यासाठी विशेष तयारी केली जात असून निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे. शिवराज्याभिषेकदिन सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम गडावरील राजसदरेवर मेघडंबरीसमोर पार पडतो. ही मेघडंबरी सजवण्याचे काम तसेच राजसदराला दरबाराचे स्वरूप आणण्याचे काम सध्या जोमाने सुरू आहे. याकरिता नक्षीकाम व कमानी उभारण्यात आल्‍या असून मंडपामध्ये बसून शिवप्रेमींना राज्याभिषेकदिन सोहळ्याचा आनंद घेता येईल.

नगारखाना ते राजसदर हा उत्सवमूर्तींच्या स्वागत मार्गावर देखण्या कमानी उभारल्या असून संदीप वेंगुर्लेकर या कलाकाराने देखावे साकारले आहेत. यासाठी २०० हून अधिक कामगार दिवसरात्र मेहनत करत आहेत. राजसदरेवरील देखाव्याबरोबरच होळीच्या माळावर, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर, मागील बाजूस ऐतिहासिक देखावे तयार केले जात आहेत. बाजारपेठेत सजावटीचे काम अंतिम टप्प्यात आहे.

प्रशासनाकडून गडावर येणाऱ्या लाखो शिवप्रेमींसाठी सुविधा पुरवण्याकरता ३३ समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, वीजपुरवठा, स्‍वच्छतागृह अशा महत्त्वाच्या सुविधांकडे विशेष लक्ष दिले जात आहे. पायथ्यापासून होळीच्या माळापर्यंत तसेच जगदीश्वर मंदिरापर्यंत ठिकठिकाणी ४० हून अधिक पाण्याच्या टाक्या ठेवल्या आहेत. पिण्याचे शुद्ध पाणी रायगड व पाचड परिसरात उपलब्‍ध करून दिले आहे. याशिवाय दीड लाख पाण्याच्या बाटल्याही वितरित केल्या जाणार आहेत.


आपत्ती व्यवस्‍थापनाची तयारी
रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने पाणीपुरवठ्याबरोबरच २०० तात्पुरती शौचालये उभारली आहेत. प्लास्टिकच्या बाटल्यांचे विघटन करणाऱ्या मशिन या ठिकाणी ठेवल्‍या आहेत. त्यांची प्रात्यक्षिकेही दाखवली जात आहे. महाड-रायगड रस्ता तसेच निजामपूर-रायगड रस्ता सुस्थितीत केले जात आहे. याशिवाय एसटीची सुविधा, पोलिस बंदोबस्त, चार ठिकाणी पार्किंगची व्यवस्था, अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी पाचाड येथे हेलीपॅड, तात्पुरती आयसीयू व्यवस्था, पाचाड येथे आरोग्य केंद्रात उपचार, व्यवस्था गडावर जाणाऱ्या शिवप्रेमींकरता एसटी वाहतूक व्यवस्था, अग्निशमन यंत्रणा, भोजन व्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन अशी सर्व तयारी प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अनेक महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार असल्याने, याकडे विशेष लक्ष दिले जात आहे.


महाड ः राजदरबारातील सुंदर कमानी, शौचालयांची सुविधा, रस्त्यांची डागडुजी