रायगडावर शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रायगडावर शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा
रायगडावर शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

रायगडावर शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

sakal_logo
By

महाड, ता. ६ (बातमीदार) : शिवकालीन वेशभूषेतील शिवप्रेमींच्या तोंडून येणारा जय भवानी, जय शिवरायाचा जयघोष, तुतारींची गगनभेदी ललकारी, ढोल-ताशांचा गजर आणि त्याला मिळालेली शाहिरी मुजऱ्याची जोड अशा उत्साही आणि मंगलमय वातावरणात आज रायगडवर तारखेनुसार ३५० वा शिवराज्याभिषेक साजरा करण्यात आला. या सोहळ्याला शिवप्रेमींची मोठी गर्दी झाली होती.
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्‍सव समिती दुर्गराज रायगड यांच्या वतीने आज ६ जूनला रायगडावर पार पडलेल्या या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याला माजी खासदार संभाजी राजे छत्रपती, शहाजीराजे, संयोगीता राजे भोसले, आमदार मंगेश चव्हाण, आमदार रोहित पवार, समितीचे अध्यक्ष फत्ते सिंह सावंत उपस्थित होते. सकाळी ध्वज पूजन झाल्यानंतर नगारखान्याजवळ ध्वजारोहण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. गडावर सायंकाळपासूनच पारंपरिक वेशभूषेत शिवप्रेमी येथे दाखल होत होते. राजसदरेवर शाहिरी मुजरा रंगत होता. संभाजी राजे व शहाजीराजे यांच्यासमवेत छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी वाजतगाजत राजसदरेवर आणण्यात आली. राजसदरेवर महाराजांच्या प्रतिमेची छत्रपती घराण्याच्या राजपुरोहितांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करण्यात आली व शिवरायांच्या उत्सवमूर्तीवर संभाजी राजे व शहाजीराजे यांनी सुवर्णनाणी, सप्तनद्यांचे जल व दुग्धाभिषेक केला. चंदूकाका सराफ यांच्याकडून बनवून घेण्यात आलेल्या साडेतीनशे सुवर्ण कोणाच्या प्रतिकृतीचा अभिषेकदेखील या वेळी करण्यात आला. मेघडंबरीतील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवरायांचा जयघोष करण्यात आला. यानंतर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पोलिसांनी राजगीताच्या वाद्यावर मानवंदना दिली. आकाशातून हेलिकॉप्टरद्वारे राजसदर व रायगडावर पुष्पवृष्टी करण्यात आली. या वेळी संभाजीराजे यांनी छत्रपती शिवरायांच्या अंगी स्वाभिमान, प्रामाणिकपणा, कष्ट, उद्दिष्ट व जिद्द असे अनेक गुण होते, यापैकी काही गुण त्यांचे आचारविचार आपण अंगी बाळगले तरीही आपल्या जीवनाचे सार्थक होईल असे त्यांनी सांगितले. मावळासुद्धा सरदार, सरसेनापती, अष्टप्रधान होऊ शकतो, असा विश्वास छत्रपतींनी रयतेच्या मनात निर्माण केला होता. म्हणूनच साडेतीनशे वर्षांनंतरही शिवरायांची आठवण काढली जाते. आजचा हा सोहळा शिवप्रेमींचा रयतेचा सोहळा आहे, म्हणूनच तो खऱ्या अर्थाने लोकोत्सव आहे, अशी भावना संभाजी राजे यांनी या वेळी व्यक्त केली. या सोहळ्यानंतर विविध पारंपरिक वाद्यांच्या गजरात छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची पालखी मिरवणूक राजसदर ते शिवसमाधीपर्यंत काढण्यात आली.

---
गड-किल्ले हेच खरे जिवंत स्मारक
गड-किल्ले हीच खरी जिवंत स्मारके आहेत. येथील प्रत्येक दगडात इतिहास आहे. आम्ही सरकारला वीस वर्षे सांगून दमलो. केवळ ५० किल्ले आम्हाला द्यावेत एकही रुपयाची मदत करू नये आम्ही शिवप्रेमी या गडांचे संवर्धन करू, असा विश्वास या वेळी संभाजीराजे यांनी व्यक्त केला.