महाडकरांना पुराची धास्‍ती

महाडकरांना पुराची धास्‍ती

Published on

महाड, ता. २६ (बातमीदार) : महाड शहरांमध्ये मंगळवारी सायंकाळी निर्माण झालेली पूर सदृशस्थिती बुधवारी ओसरली असली तरी वारंवार येणाऱ्या पुरामुळे महाडकारांना आता धडकी भरू लागली आहे. दरवर्षी येणार पूर आणि दरडींचे संकटामुळे महाडकर पुरसे मेटाकुटीस आले आहेत.
महाड शहर सावित्री आणि गांधारी नदीकिनारी वसले आहे. सावित्री नदीला माणगावातील काळ नदी येऊन मिळते. त्यामुळे या तीनही नद्यांची पातळी वाढली की महाडमध्ये पूरस्थिती निर्माण होते. त्यातच महाबळेश्वर येथे पडणारा धुवाधार पाऊस व पुराचे पाण्याचा निचरा न होण्यास कारणीभूत ठरणारी भरती यामुळे शेकडो वर्षे महाडला पूर येण्याची परंपरा आहे. महाडमध्ये याला ‘उथव’ असे म्हणतात.
शहरात पूर आला की सर्वजण पाणी पाहण्यासाठी घराबाहेर पडतात. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत पुराचे पाणी येते आणि ओसरते. सावित्री माहेरवाशीण बनवून प्रत्येकाच्या घरी येऊन जाते, अशी स्‍थानिक नागरिकांची धारणा असल्‍याने अनेकजण पुराच्या पाण्याची आरती करून निरांजने नदीत सोडत.
मात्र गेल्‍या काही वर्षांत पुराचे पाणी सातत्याने शहरात शिरू लागले आहे. पुराच्या पाण्याची पातळीही वाढली आहे. १९९४, २००५ व २०२१ मध्ये महापूर आल्याने महाडकरांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून व्यापारी वर्गाचे कंबरडेच मोडले आहे.
एमआयडीसीमधील उद्योजकांनाही २०२१ मध्ये मोठा फटका बसला होता. त्यामुळे अनेक वर्षांपासून अंगवळणी पडलेला महाडचा पूर, म्हणजेच ‘उथव’ आता महापुरात रूपांतरित होत आहे. वारंवार घरातील सामानाचे होणारे नुकसान, व्यापाऱ्यांची दमछाक, सातत्‍याने होणारे नुकसान याला महाडकर कंटाळले आहेत. सावित्री तसेच इतर नद्यांमधील गाळ काढल्याने या वर्षी अद्याप शहरात पूर आला नसला तरी नागरिकांच्या मनात मात्र भीती कायम आहे.

भोंगे वाजवून सतर्कतेचा इशारा
महाड (बातमीदार) : महाड तसेच परिसरामध्ये पावसाचा जोर अजूनही कायम असल्याने महाड शहरामध्ये मंगळवारी दुपारनंतर पुन्हा पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. सावित्री व गांधारी नदीतील पाण्याची पातळी वाढल्‍याने महाड नगरपालिकेने भोंगे वाजवून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. तालुक्‍यात आतापर्यंत दोन हजार १०० मिमी पावसाची नोंद झाली असून पावसाची संततधार अजूनही सुरूच आहे.

बाजारपेठेसह सखल भाग पाण्यात
महाड बाजारपेठेबरोबरच सखल भागात पाणी साचते. बिरवाडी, वाळण, एमआयडीसी, रायगड या भागात पर्जन्यवृष्टी होत असल्याने गांधारी, काळ व सावित्री नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. शहरातील दस्तुरी नाका ते नातेखिंड मार्गावर गांधारी नदीचे पाणी शिरले आहे. सावित्री नदीच्या पाण्याची पातळी ६.१५ मीटर एवढी पोचली आहे. नगरपालिकेचे आपत्कालीन मदत पथक सज्ज असल्याची माहिती मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी दिली.


महाड ः सावित्रीची पातळी वाढल्‍याने मंगळवारी पूरस्‍थिती निर्माण झाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.