कलगी-तुराला हवा लोकाश्रय

कलगी-तुराला हवा लोकाश्रय

सुनील पाटकर, महाड
कोकण म्हटले की गणेशोत्सव आणि कोकणातील गणेशोत्सव म्हटला की जाकडी अथवा जाखडी नृत्य किंवा कलगीतुरा याचे वेगळेच महत्त्व आहे. सण-उत्‍सवात जाकडी नृत्याच्या परंपरेला वेगळे स्थान आहे. गणेशोत्सवात गाव आणि वाड्या-वस्‍त्‍यांवर ‘गणा धाव रे, गणा पाव रे’ या गाण्याबरोबरच ढोलकी आणि घुंगराच्या तालावर सादर होणारा कलगी-तुरा आजही कोकणात आपले स्थान टिकवून आहे. जाकडी नृत्याला कलगीतुरा, शक्ती तुरा, बाल्या नृत्य अशा वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. खडी म्हणजे उभे राहणे आणि जाकडी म्हणजे जखडून ठेवणे असा नृत्यामागील उद्देश आहे. ही लोककला असल्याने याचा उगम कधी झाला, हे निश्‍चित सांगणे अवघड असले तरीही कलगी म्हणजे आदिमाया पार्वती आणि तुरा म्हणजे श्री भगवान शंकर. त्यामुळे त्या नृत्याला पौराणिक आधार असल्‍याचे मानले जाते.
कलगी-तुरामध्ये पायात घुंगरू बांधून वर्तुळाकार नृत्य केले जाते. आठ ते दहा जणांचा गट ठेका धरून ढोलकी, झांज आणि टाळ्यांच्या गजरात वेगवेगळी गीतांच्या तालावर नृत्‍य करतो. यामध्ये एक-दोन गायक, ढोलकी किंवा मृदंगवादक तसेच विविध वाद्यवादक असतात. शिवाय मुख्य गायक आणि कोरसही असतात. सर्वजण मधोमध असतात आणि त्‍यांच्या भोवताली भरजरी कपडे घालून पदलालित्य करत नृत्य केले जाते. या नृत्यांमध्ये ईशस्तवन, गण-गवळण, सवाल जवाब, भक्तिपर गीते, माहितीपर गाणी सादर केली जातात. कलगी-तुरा किंवा शक्ती तुरामध्ये दोन गट एकमेकांचा सामना करतात यामध्ये पौराणिक ग्रंथांचा आधार घेऊन दोन्ही गटाचे गायक म्हणजेच बुवा आपापल्या बुद्धी चातुर्याने एकमेकांपुढे प्रश्न टाकतात व शास्त्राचा आधार घेऊन विरोधी गट प्रश्नांची अचूक उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो. यातूनच दोन्ही गटातील ग्रंथवाचन, पुराणातील अभ्यास स्पष्ट होतो. यातील गीते देखील गीतकार स्वतः लिहितात तर ढोलकीच्या तालावर संगीत देण्याचे कसबही कलाकार करतात. चित्रपटांच्या अथवा इतर चालींवर विविध गीते सादर करून त्यावर गोल फिरून नृत्य सादर केले जाते. अनेकदा शिक्षणाचा प्रसार, आरोग्य जागृती, वणवा थांबवणे, मुलगी वाचवा, पाणी बचत अशा विविध संकल्पनेचा आधार घेत नृत्य सादर केले जाते.

‘डबलबारी’ म्‍हणून ओळख
ग्रामीण भागामध्ये कलगी-तुराचा सामना हा ‘डबलबारी’ या नावाने ओळखला जातो. ही डबलबारी पाहण्यासाठी आता शहरी भागातही मोठी गर्दी होऊ लागली आहे. जाकडी नृत्यात नाचणारे कलाकार, त्यांचा आकर्षक व विशिष्ट असा पोशाख, सादर केले जाणारी एक पावली, दोन पावली, तीन पावली अशा चालींवरील नृत्य, काव्यात्मक जुगलबंदी अशा विविध अंगाने कलगी-तुऱ्याच्या नृत्याची रंगत असते. अनेक दशकांपासून सुरू असणारी ही लोककला जिवंत ठेवण्याची प्रयत्‍न होणे गरजेचे आहे.

.............
आज मुंबईत चर्चासत्र, शिबिर
महाराष्ट्रातील कलगी-तुरा-लोककला परंपरेत साठ वर्षे वाटचाल करणारी कलगी-तुरा समाज उन्नती मंडळ- मुंबई या संस्थेकडून ही कला संवर्धन करण्यासाठी प्रयत्न सुरू असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, आदिती तटकरे आदी मंत्र्यांना मंडळाने परंपरा जतन करण्याबाबत निवेदनही दिले आहे. मुंबईतील परळ येथे मेहता बिल्डिंग, दामोदर हॉल शेजारी येथे रविवारी (ता.७) सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेमध्ये चर्चासत्र व मार्गदर्शन शिबिर होणार आहे. शिबिरामध्ये कलगी व तुरा मतभेद मिटविणे, नियमावली कलेचे संवर्धन व जतन, कलाकार शाहीर यांच्याशी सुसंवाद, गीत लेखन मार्गदर्शन अशा विविध बाबींवर चर्चा केली जाणार आहे. तरी या लोककलेतील मंडळाचे प्रतिनिधी, वस्ताद, गुरुवर्य , शाहीर, आयोजक, कलाप्रेमी रसिक यांनी उपस्थित राहून चर्चासत्रामध्ये सहभाग घेण्याचे आवाहनही मंडळाकडून करण्यात आले आहेत.

सरकारी पातळीवर विविध लोककलांना प्राधान्य दिले जात असतानाच कलगी-तुरा या लोककलेचे संवर्धन व उन्नती होणे गरजेचे आहे. यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या कलगी-तुरामध्ये अश्लील हावभाव, गाणी यांचा समावेश होत आहे हे सर्व टाळून खरी कला जतन करण्यासाठी व्यापक प्रयत्‍नांची गरज आहे. सरकारकडूनही ही कला जतन करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.
- संतोष धारशे, सचिव, कलगी-तुरा समाज उन्नती मंडळ, मुंबई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com