मतदार प्रतिक्रिया .महाड

मतदार प्रतिक्रिया .महाड

मतदार प्रतिक्रिया

भारतामध्ये सध्याच्या परिस्थीतीत गरीब, मध्यमवर्गीय व श्रीमंत असे तीन आर्थिक वर्ग तयार झाले आहेत. यात मध्यमवर्गीयांना महागाईची झळ सर्वाधिक बसते. श्रीमंत व्यक्‍ती पैशाच्या जोरावर सर्व सुख-सोयी उपभोगू शकतो. तर दारिद्र्य रेषेखालील व्यक्‍तींसाठी सरकार विविध योजना राबवतात, सवलती देतात. मध्यमवर्गीय मात्र आपल्‍या कमाईतील हिस्‍सा करस्‍वरूपात सरकार दरबारी जमा करीत राहतो. तुलनेने त्‍याला मिळणाऱ्या सुविधाही गौण असतात. सरकारने मध्यमवर्गीय जनतेचा विचार करावा, ग्रामीण भागात पायाभूत सुविधांवर भर द्यावा, रोजगाराच्या संधी उपलब्‍ध करून द्याव्यात.
- उमेश गोपाळ डंबे, महाड

....................

ग्रामीण भागातील दर्जेदार विकासासाठी प्रयत्‍न करणारा उमेदवार निवडून येणे अपेक्षित आहे. श्रीवर्धन, हरिहरेश्‍वरमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्‍न होणे गरजेचे आहे. त्‍यामुळे लघुउद्योजकांसह, बचतगटांना रोजगार उपलब्‍ध होईल. नव्याने होऊ घातलेल्‍या दिघी, आगरदांडा पोर्टमध्ये स्‍थानिकांना नोकरीत प्राधान्य मिळावे, कौशल्‍य विकासासाठी चांगल्‍या प्रशिक्षण संस्‍था ग्रामीण भागात उभारणे गरजचे आहे. याशिवाय जिल्‍ह्यात अद्ययावत आरोग्‍य व्यवस्‍था, उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी चांगल्‍या शैक्षणिक संस्‍था सुरू करण्याच्या दृष्‍टिने प्रयत्‍न होणे गरजेचे आहे.
- दीपाली देवेंद्र पिळनकर, व्यावसायिक, दिवेआगर-श्रीवर्धन

-----------

देशातील प्रत्‍येक सज्ञान नागरिकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. ग्रामीण भागातील महिला वर्गाने आपले कर्तव्य समजून बहुसंख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे. कोकणातील ग्रामीण भागात पर्यटन वाढीसाठी गोवा तसेच केरळच्या धर्तीवर प्रयत्न होणे गरजेचे असून त्‍यासाठी सरकारी पातळीवर मूलभूत, पायाभूत सोयी-सुविधांसाठी प्रयत्‍न होणे गरजेचे आहे. जिल्‍ह्यात दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळाव्यात. मुलामुलींना उच्च शिक्षण मोफत मिळावे. महागाईसोबत गॅस, वीज, पेट्रोल, खाद्यतेल इत्यादी जीवनावश्यक बाबीचे दर नियंत्रित असावे.
- जान्हवी मांजरेकर, व्यावसायिक, दिवेआगर-श्रीवर्धन
.........................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com