पर्यावरण संवर्धनासाठी नगरपालिकेची पावले, पाच जूनला शहरातील विविध भागात व सोसायटीमध्ये होणार वृक्ष लागवड

पर्यावरण संवर्धनासाठी नगरपालिकेची पावले, पाच जूनला शहरातील विविध भागात व सोसायटीमध्ये होणार वृक्ष लागवड

महाडमध्ये दीड हजार वृक्षलागवडीचा संकल्‍प

पर्यावरण संवर्धनासाठी नगरपालिकेची पावले; नागरी संस्‍था, गृहसंकुलांत उपक्रम राबवणार

महाड, ता. २ (बातमीदार) ः तापमान वाढीने यंदा उच्चांक केल्याने अनेक ठिकाणी मे मध्ये ४२ अंशाच्या वर तापमान पोहोचले होते. महाडमध्ये देखील तीव्र उन्हाळ्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी महाड नगरपालिकेने ५ जूनला जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी वृक्ष लागवड व संवर्धनाचा उपक्रम हाती घेतला आहे. शहरातील नागरिक संस्था तसेच गृहनिर्माण सोसायटी देखील सहभागी होणार आहे. महाड शहरात किमान दीड हजार वृक्षलागवड करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
शहरांमध्ये नवनवीन इमारती उभ्या राहू लागल्याने मोकळ्या जागांची संख्या कमी होत आहे. त्याचा परिणाम तापमान वाढीवर दिसू लागला आहे. दोन-तीन वर्षांपासून शहरातील तापमान ४२ ते ४३ अंशापर्यंत पोहोचले आहे. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी महाड नगरपालिकेने रायगड जिल्हा गृहनिर्माण महासंघाच्या सहकार्याने शहरामध्ये वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबवण्याचे ठरवले आहे.
माझी वसुंधरा या अभियानांतर्गत हा कार्यक्रम राबवला जाणार आहे. महाड नगरपालिकेने वृत्तपत्रांमध्ये तसेच सोशल मीडियावर जाहिरात देऊन गृहनिर्माण संस्थांना या उपक्रमात सहभागी करून घेतले आहे. गृहनिर्माण संस्थांनी आपल्या विभागात झाडांची लागवड करावी यासाठी प्रत्येक गृहनिर्माण संस्थेची संपर्क साधण्यात आलेला आहे. महाड शहरातील नागरिक, सामाजिक संस्था, शाळा झाडे लावण्याचे उपक्रमात सहभागी होणार आहे. यासाठी नगरपालिकेने देशी वृक्षांची निवड केली असून प्रत्येक जण आपल्याला हव्या असणाऱ्या झाडांची मागणी नोंदणी करून घेऊ शकणार आहे.
महाड नगरपालिकेकडून नारळ, महोगनी बहावा, बकुळ, कदंब, कांचन ,चिंच, अर्जुन, कडुलिंब, वड, पिंपळ ,अशोक, पुत्रंजिवा, सुपारी, जांभूळ, उंबर, फिश टेल पाम व फणस अशा झाडांची रोपे पुरवली जाणार असल्याचे आरोग्य व स्वच्छता विभाग अभियंता परेश साळवी यांनी सांगितले. सोसायटीच्या जागेमध्ये तसेच सार्वजनिक व खासगी जागेमध्ये झाडांच्या रोपांची मागणी आल्यानंतर नगरपालिकेकडून खड्डे खोदाई व झाडांची लागवड मोफत करून दिली जाणार आहे. यानंतर झाडांची देखरेख व त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी गृहनिर्माण सोसायटी व नागरिकांची राहणार आहे. सर्व देशी वृक्षांची मागणी नागरिक तसेच गृहनिर्माण सोसायटी यांनी नगरपालिकेकडे केली आहे. पाच जूनला गृहनिर्माण सोसायटीच्या जागेत शाळा तसेच मोकळ्या जागेत सुमारे दीड हजार वृक्षांची लागवड केली जाणार आहे.

नगरपालिकेकडून सुमारे २० देशी वृक्षांची रोपांचे वृक्ष लागवडीसाठी वाटप करण्यात येणार आहे. इच्छुक असणारे नागरिक, संस्था तसेच गृहनिर्माण सोसायट्यांना मोफत पुरवली जाणार आहेत. माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत ही मोहीम राबवली जात आहे.
- धनंजय कोळेकर, मुख्याधिकारी, महाड नगरपालिका
.......

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com