रायगडावर लोटला शिवसागर

रायगडावर लोटला शिवसागर

रायगडावर लोटला शिवसागर
शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा

महाड, ता. ६ (बातमीदार) ः शिरकाईचा गोंधळ झाला आणि कडेकपारीत ‘जय भवानी जय शिवराय’ जयघोष निनादला... मावळ्यांच्या खांद्यांवर भगवे ध्वज फडकले... शाहिरांची डफावर थाप पडली... पोवाड्यांनी अवघा परिसर दणाणला... नगारे झडले... फुलांची आणि भंडाऱ्याची उधळण झाली.... आणि राजपुरोहितांच्या मंत्रोच्चारात शिवरायांच्या उत्सव मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. रायगडावर जमलेल्या लाखो शिवप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा हा शिवराज्याभिषेक दिन सोहळा सह्याद्री व रायगडाने आज अनुभवला.
लाखो शिवभक्‍तांचा उत्साह व भारावलेल्या वातावरणात दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात साजरा झाला. कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर सुवर्णनाण्यांचा अभिषेक करण्यात आला आणि ‘जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवाजी’ या जयघोषात हा परिसर दणाणून गेला. पहाटेची वेळ, सनईचे मंगल सूर, तुतारीचा निनाद, धनगरी ओव्या, पोवाडे आणि पारंपरिक मर्दानी खेळ अशा वातावरणामध्ये रायगड किल्ला शिवमय झाला होता. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगडावर या वर्षीही शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा झाला. या वेळी युवराज्ञी संयोगिता राजे, आमदार रोहित पवार, मराठा योद्धा जरांगे-पाटील तसेच समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून आणि देश-विदेशांतूनही अनेक लोक रायगडावर दाखल झाले होते. सकाळी नगारखान्याजवळील ध्वजाचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. पारंपरिक वेशभूषेत शिवप्रेमी येथे दाखल होते. महिलादेखील शिवकालीन पोषाखात आल्या होत्या. लहान मुले बाल शिवाजी बनून आली होती. राजसदरेवर शाहिरी मुजरा रंगत होता. गडावर वाजणारे ढोलताशे, होळीच्या माळावर लाठ्याकाठ्या, भाले, दांडपट्टे, तलवारीसह खेळले जाणारे मर्दानी खेळ शिवप्रेमींच्या अंगावर रोमांच उभे करत होते. यामुळे गडावर शिवकाल अवतरल्याचे भासत होते. संपूर्ण मेघडंबरी व शिवरायांच्या पुतळ्याची सजावट करण्यात आली होती. गडावरील विविध वास्तूंना विद्युत रोषणाईने सजविण्यात आले होते. अनेक ठिकाणी फुलांची रांगोळी व सजावट करण्यात आली होती.
...
विधिवत पूजा, पालखी मिरवणूक
छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी वाजतगाजत राजसदरेवर आणण्यात आली. राजसदरेवर महाराजांच्या प्रतिमेची छत्रपती घराण्याच्या राजपुरोहितांच्या मंत्रोच्चारात विधिवत पूजा करण्यात आली व शिवरायांच्या उत्सव मूर्तीवर संभाजी राजे व शहाजीराजे यांनी सुवर्णनाणी, सप्त नद्यांचे जल व दुग्धाभिषेक केला. मेघडंबरीतील शिवरायांच्या पुतळ्याला सुवर्णनाण्यांचा अभिषेक करण्यात आला. विविध पारंपरिक वाद्यवृंदात व जयघोषात छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक राजसदर ते शिवसमाधीपर्यंत काढण्यात आली.
.............
गडकिल्ले हा आपला खरा वारसा ः छत्रपती संभाजी राजे
महाड (बातमीदार) : गडकिल्ले हा आपला खरा वारसा असून त्यांचे जतन झाले पाहिजे. म्हणूनच रायगड संवर्धन ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी रायगड किल्ल्यावर केले.
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने रायगड किल्ल्यावर आज छत्रपती शिवरायांचा ३५१वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. या सोहळ्याला युवराज संभाजीराजे, शहाजीराजे यांच्यासह खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार रोहित पवार, आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार अनिकेत तटकरे, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील, प्रभाकर देशमुख, आमदार बच्चू कडू, अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे अध्यक्ष संदीप खांडेकर उपस्थित होते.
शिवप्रेमींना मार्गदर्शन करताना युवराज संभाजीराजे यांनी, ज्या मातीला छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झाला आहे, त्या मातीत त्यांचा वंशज म्हणून काम करताना आपल्याला अभिमान वाटत असल्याचे सांगितले. आपण आज जे कोणी आहोत, ते केवळ शिवरायांमुळे आणि या रायगडामुळे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी युवराज संभाजीराजे यांनी राजकीय भाष्य करणे टाळले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com