महाडमध्ये रुग्‍णालयासाठी १४८ कोटी

महाडमध्ये रुग्‍णालयासाठी १४८ कोटी

Published on

महाड, ता. ४ (बातमीदार) : महाड तालुक्यासह लगतच्या गावे-पाड्यांतील रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळावी तसेच अपघातग्रतांनाही तत्काळ उपचार मिळावेत, या दृष्टिने महाड जवळील केंबुर्ली येथे २०० खाटांचे भव्य सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येणार आहे. रुग्‍णालयाच्या मुख्य इमारतीच्या बांधकामासाठी व आराखड्यासाठी राज्य सरकारने सुमारे १४८ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली आहे.
भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी सरकारकडे याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. महाड व पोलादपूर तालुके हे दरडग्रस्त तालुके आहेत. या तालुक्यात वारंवार नैसर्गिक आपत्ती घडतात. महाड येथे औद्योगिक वसाहत आहे तर कोकण रेल्वेचे तसेच घाटमार्गाचे व महामार्गाचे मोठे वाहतूक जाळे आहे. यामुळे येथे अद्ययावत रुग्‍णालयाची गरज निर्माण झाली होती.
महाड तालुक्यात सध्या उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सुविधांवर मंडणगड, दापोली, श्रीवर्धन, म्हसळा हे तालुके अवलंबून आहेत. परंतु त्या तुलनेत आरोग्य सुविधा नाहीत. सद्यःस्थितीत या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर असले तरी तेथे कर्मचाऱ्यांची वानवा असल्‍याने मुंबई-पुणे गाठावे लागते. महाडकारांच्या अडचणीचा विचार करून, आमदार प्रवीण दरेकर यांनी महाड येथे अत्‍याधुनिक सोयी-सुविधांयुक्‍त रुग्‍णालय उभारण्यासाठी पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांच्याकडे वारंवार या संदर्भात बैठकाही झाल्या व या बैठकांमधून महाड येथे असे रुग्णालय उभारण्यास तत्त्वतः मान्यता मिळाली होती. परंतु आता याबाबत सरकारने रुग्‍णालयावर शिक्कामोर्तब केले आहे.

अपघातग्रस्‍तांना मिळणार तत्‍काळ उपचार
महाड शहरानजिक मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या केंबुर्ली येथील ४२ हेक्टर सरकारी जागेत २०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभे राहणार आहे. याकरिता राज्य सरकारने इमारत बांधकाम अंदाजपत्रक व आराखड्यास १४७ कोटी ७० लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली आहे. हे रुग्‍णालय उभे राहिल्यानंतर महाडकरांना मोठ्या आजारांवरील उपचार व शस्‍त्रक्रियांसाठी मुंबई-पुण्यात जाण्याची गरज उरणार नाही. तर अपघातातील गंभीर जखमींनाही तत्काळ उपचार मिळणार असून मृत्यूचे प्रमाण कमी होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.