रायगड किल्ल्यावर पर्यटकांसाठी बंदी

रायगड किल्ल्यावर पर्यटकांसाठी बंदी

Published on

महाड, ता.८ (बातमीदार): रायगड किल्ला परिसरात पर्यटकांचा ओघ वाढला आहे. अशातच रविवारी दुपारनंतर अचानक आलेल्या पावसामुळे किल्ल्यावर अडकलेल्या ३०० शिवप्रेमींना पोलिस प्रशासनाने रोप-वे ने गडाखाली उतरवले होते. या घटनेनंतर सतर्क झालेल्या जिल्हा प्रशासनाने सुरक्षेच्या अनुषंगाने ३१ जुलैपर्यंत रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यानंतरही रविवारी (ता.७) मोठ्या संख्येने पर्यटक गडावर दाखल झाले होते. दुपारनंतर मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली. रायगडावर अशी अतिवृष्टी नेहमीच होत असते. परंतु, यापूर्वी पावसाळ्यात गडावर पर्यटक येत नसल्याने फारसा त्रास कोणाला होत नव्हता. अशातच अचानक झालेल्या अतिवृष्टीने महादरवाजा येथील पायरी मार्गावर वेगाने पाणी वाहू लागल्याने गड उतरणारे काही पर्यटक अडकून राहिले. पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने रेलिंगला व धक्क्याला पकडून पर्यटक गड उतरले. तर काहीजण गडावर मध्यभागी थांबूनच राहिले होते. तब्बल एक तासाने पाणी ओसरल्यानंतर या थरारक अनुभवाला सामोरे जाणाऱ्या पर्यटकांचा जीव भांड्यात पडला होता.
-----------------------------------------------
रोपे-वे सेवाही बंद
पावसाळ्यात रायगडावर किल्ल्यावर येणारे पर्यटक सातत्याने अशाच प्रकारचे धाडस करत असल्याचे दिसून आले आहे. गडावर रायगड रोपे-वे ने जाता येते. परंतु अतिवृष्टीचा धोका लक्षात घेता आता पर्यटकांना मज्जाव करण्यात आला आहे. तसेच पुढील आदेश मिळेपर्यंत ही सेवा बंद आहे.
-------------------------------------------------
हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. खबरदारीचा इशारा म्हणून किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेला आहे.
- डॉ. ज्ञानोबा बाणापुरे, प्रांताधिकारी, महाड
-------------------------------------------------
गडावरील चित्त व नाणे दरवाजा येथे बॅरिकेट्स टाकण्यात आले आहेत. हा रस्ता पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे.
- राजेंद्र मायने, पोलिस निरीक्षक
------------------------------------------------
फोटो ओळ ः रायगड ः किल्ल्यावरील चित्त व नाणे दरवाजा येथून जाणारी पायवाट पोलिस प्रशासनाने बंद केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.