पावसाळी पर्यटन स्थळी महाड महसूल विभागाकडून सूचनाफलक

पावसाळी पर्यटन स्थळी महाड महसूल विभागाकडून सूचनाफलक

Published on

पावसाळी पर्यटन स्थळी सूचनाफलक
महाड महसूल विभागाकडून उपाययोजना

महाड, ता. १० (बातमीदार) : तालुक्यातील धबधबे, धरणे व पर्यटन स्थळी येणाऱ्या पर्यटकांसाठी महाड महसूल विभागाकडून सूचना फलक लावण्यात आले असून पर्यटकांसाठी मार्गदर्शकपर माहिती देण्यात आली आहे. तसेच आपत्कालीन संपर्क क्रमांकही नमूद करण्यात आला आहे.
काही दिवसांपासून पडणाऱ्या अतिवृष्टीमुळे धरण, धबधब्यांतील प्रवाह वाढला आहे. नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत. अशावेळी पर्यटकांचा जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी रायगडावर पडलेल्या अतिवृष्टीमुळे पर्यटकांची तारांबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर रायगड किल्ला बंद करण्यात आल्यानंतर आता महाड तालुक्यातील विविध पावसाळी पर्यटन स्थळांजवळ तसेच धबधब्यांजवळही सूचना फलक लावण्यात आले आहे. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांनी कोणती काळजी घ्यावी, कसे वर्तन करावे, सोबत कोण कोणती आवश्यक साधने असावी याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. व्हिडिओ शूटिंग व सेल्फी काढणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून देण्यात आलेला सूचना फलकावर नमूद केल्‍या आहेत. महाडमधील केंबुर्ली धबधबा, ढालकाठी, शिवथरघळ, शेवते, मांडले, कोतुर्डे धरण, किल्‍ले रायगड परिसरातील धबधबे अशा अनेक ठिकाणी महसूल विभागाकडून सूचना फलक लावण्यात आले आहे.

पावसाळी पर्यटन स्थळावर येणाऱ्या पर्यटकांना आवश्यक माहिती उपलब्ध व्हावी तसेच सहलीचा आनंद घेताना कोणती काळजी घ्यावी याबाबतच्या सूचना देणारे फलक सर्वत्र लावण्यात आले आहेत.
- महेश शितोळे, तहसीलदार, महाड

महाडः महसूल विभागाने धबधबा परिसरात सूचना फलक लावले आहे.

................

पावसाचा जोर कायम
रेवदंडा,ता. ११ (बातमीदार) : पावसाचा जोर गुरुवारी सकाळी कायम होता. अनेक सखल भागातील पाणी साचले होते, ते दुपारनंतर ओसरण्यास सुरुवात झाली. काही ठिकाणी ठप्प झालेली भात लावणीची कामे पुन्हा सुरू झाली आहेत, मात्र मजुरांअभावी शेतकऱ्यांची धावपळ होताना दिसली. बागायतदार सुपारीच्या झाडावर औषध फवारणी करण्याच्या लगबग आहेत. नद्या, नाले, ओढे दुथडी भरून वाहू लागले असून ग्रामीण भागात गोड्या पाण्यातील मासेमारी सुरू झाली आहे.

...................

खोपोलीत खड्ड्यांविरोधात संताप
खोपोली, ता. ११ (बातमीदार) ः खोपोलीतील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे अपघात वाढल्‍याने नागरिकांमधून संताप व्यक्‍त होत असून लवकरात लवकर डागडुजी करण्याची मागणी करण्यात येत आहे. खोपोली नगर पालिकाकडून भुयारी गटारींचे काम सुरू असून शहरातील रस्‍त्‍यांवर खोदकाम करण्यात आले आहे. ठेकेदारांनी तात्पुरती डागडुजी व मलमपट्टी केल्‍याने मुसळधार पावसात रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. डांबरीकरण करणार नसाल तर किमान खड्डे बुजवावेत, अशी मागणी नागरिक व सामाजिक संस्थाकडून करण्यात येत आहे.

खोपोली : शहरातील खड्डे अपघातांना आमंत्रण देत आहेत.

.................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.