महाडमधील धरणांसह नद्या तुडुंब
महाड, ता. १ (बातमीदार) : तालुक्यात मे व जून महिन्यात जोरदार पाऊस झाल्याने तालुक्यातील सर्व धरणे तुडुंब भरली आहेत. शेती व बागायतीला पुरेसा पाणीसाठा उपलब्ध झाला असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तर महाड शहराप्रमाणे परिसरातील गावांचा पाणीप्रश्नही मिटला आहे.
धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडत असल्याने आणि या भागातील वातावरण निसर्गरम्य झाल्याने पावसाळी पर्यटकांची संख्या वाढली आहे. यावर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासूनच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे तालुक्यातील सावित्री, काळ, गांधारी व नागेश्वरी या मुख्य नद्यांसह सर्व लहान नद्याही दुथडी भरून वाहू लागल्या आहेत.
आतापर्यंत तालुक्यात ७८३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे पाणीसाठा वाढला आहे. मेमध्ये महाड तालुक्यात सुमारे १५० गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचली होती. पावसाचे जोरदार आगमन झाल्याने आणि आता धरणात चांगल्या प्रकारे पाणी साठल्याने पाणीटंचाईचे संकट दूर झाले आहे.
महाड तालुक्यामध्ये रायगड पाटबंधारे विभागाअंतर्गत खैरे, वरंध, कोथुर्डे व खिंडवाडी (आंबवडे) ही चार धरणे असून, सर्व तुडुंब भरून वाहू लागली आहेत. या चार धरणांमध्ये मिळून ६.४१७ दलघमी एवढा पाणीसाठा आहे. या सर्व धरणांवर त्या त्या भागातील पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. कोथुर्डे धरणामध्ये मुबलक साठा झाल्याने महाड शहरातील पाणीटंचाईही दूर झाली आहे. याशिवाय विन्हेरे पारदुलेवाडी येथे लघू पाटबंधारे विभाग, तर कुर्ला येथे महाड नगरपालिकेचे धरण आहे. ही धरणेही तुडुंब भरली आहेत. कोथुर्डे आणि कुर्ला धरणातून महाड शहराला पाणीपुरवठा होतो. महाड तालुक्यातील धरण क्षेत्र परिसरात हौशी पर्यटक दाखल होत आहेत.
महाड तालुक्यात पावसाचा जोर कायम असल्याने कोथुर्डे आणि कुर्ला ही धरणे तुडुंब भरली आहेत. यामुळे शहरातील पाणीटंचाई दूर झाली आहे.
- रोहित भोईर, अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महाड
धरणे व पाणीसाठा (दलघमी)
वरंध - २.२५०
कोथुर्डे - २.४९३
खैरे - १.६७०
खिंडवाडी - २.११७
विन्हेरे - १.८८
कुर्ला - ०.५४
महाड ः कुर्ला धरण तुडुंब भरल्याने विसर्ग सुरू झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.