लाडक्या बहिणींची रेशीम धाग्याला पसंती

लाडक्या बहिणींची रेशीम धाग्याला पसंती

Published on

लाडक्या बहिणींची रेशीम धाग्याला पसंती
- शेकडो प्रकार बाजारात

महाड, ता. ३१ (बातमीदार) ः भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक समजला जाणारा दिवस म्हणजे रक्षाबंधन. यंदा रक्षाबंधन शनिवारी (ता. ९ ) ऑगस्टला असून, आतापासूनच बहिणींची राख्या खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. रक्षाबंधन सणानिमित्त राख्यांचे शेकडो प्रकार बाजारात आले असले तरीही पारंपरिक रेशमी धाग्यांच्या राख्यांनाच अधिक पसंती असल्याचे दिसत आहे. तर राख्यांसोबत भेटवस्तू आणि मिष्टान्न भेट देण्याचा फंडा ऑनलाइन साइट्सनी अवलंबलेला आहे.
मुंबई जवळ असल्याने जिल्ह्यात इंदूर, अहमदाबाद, बडोदा, मुंबईहून घाऊक दरात राख्या आणल्या जातात. यंदा बाजारातून चिनी राख्या हद्दपार झालेल्या दिसत आहेत. बाहेरगावी असलेल्या भावाला पोस्टाने वेळेत राखी पाठवायची असल्याने बहिणींची राख्यांची खरेदी सुरू झाली आहे. बाजारपेठाही रंगीबेरंगी राख्यांनी सजल्या आहेत. यात लहान मुलांसाठी शक्तिमान, छोटा भीम, डोरेमॉन, बाहुबली, बाल गणेश, हनुमान, वर्ल्ड कप, मिकी माउस राख्या उपलब्ध आहेत. तर नवीन प्रकारात चंदनाचा सुगंध देणाऱ्या सुगंधी, आकर्षक मण्यांनी मढवलेल्या, ज्वेलरी पॅटर्न, जरीकाम, लायटिंग, चमकदार वेस्टर्न, चांदीच्या मण्यांसह विविध फॅन्सी राख्या बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत.
बाजारात सुती राख्या व रेशमी राख्या १० रुपयांपासून असून, ज्वेलरी पॅटर्नमध्ये अमेरिकन डायमंड राखी २५० रुपयांना आहे. बाजारात वेगळ्या सुवर्ण राख्या आल्या असून, या राख्यांवर देवदेवतांचे फोटो आहेत. या राख्या ८० ते २५० रुपयांपर्यंत आहेत. तसेच जरीची राखी, चंदन राखी, मोती राखी आणि नाण्याची राखी या नवीन प्रकारच्या राख्या बाजारात आल्या आहेत. त्यांची किंमत ५० ते ८० रुपयांपर्यंत आहे. चंदन राख्यांवर विविध नक्षीकाम केलेल्या राख्या कोलकाता येथून आल्या आहेत. या राख्यांची किमत ७० रुपये इतकी आहे. अशातही रेशमी लाल धाग्यांच्या राख्यांनी आपले अस्तित्व टिकवले असून, महिलांची पसंती मिळत आहे. ऑनलाइन शॉपिंग कंपन्यांनीही राखी विक्री सुरू केली आहे. राख्यांसोबत भेटवस्तू तसेच मिष्टान्न असे प्रकारही ऑनलाइन व बाजारपेठेत आले आहेत. त्यामुळे तरुणाई ऑनलाइन खरेदीकडे वळलेली आहे.

यावर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. राख्यांमध्ये प्रकारानुसार किमती आहेत. पारंपरिक रेशीम धाग्याच्या राखीला चांगली मागणी आहे.
- महेंद्र पूरबिया (राखी विक्रेता)


फोटो - राख्यांनी सजलेली दुकाने

महेंद्र पूरबिया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com