तैवानच्या पेरुमुळे तरुण लखपती
तैवानच्या पेरूमुळे तरुण लखपती
महाड तालुक्यात शिरसवणेत लागवड, पारंपरिक शेतीला पर्याय
महाड, ता. ५ (बातमीदार) : तरुणांनी शेतीकडे पाठ फिरवल्याने कोकणातील शेती ओस पडत आहे; परंतु महाड तालुक्यातील शिरसवणे गावातील संतोष भोसले हा तरुण मात्र अपवाद ठरला आहे. संतोषने तीन एकराच्या शेतात तैवान जातीच्या पेरूची लागवड करून प्रयोगशील शेतीतून आठ ते दहा लाखांचे उत्पन्न मिळवले.
महाड तालुक्यातील शिरसवणे गावातील संतोष भोसलेने नोकरीऐवजी गावातच शेती करण्याचा निर्णय घेतला. गरीब कुटुंबातील शेतकरी असल्याने स्वतःकडे वीस गुंठे जमीन होती. अशावेळी बाजूच्या शेतकऱ्याची जमीन भाडेकरारावर घेऊन संतोषने सुमारे साडेतीन एकरमध्ये तैवान जातीच्या पेरूची लागवड केली आहे. पेरूलागवडीला १४ महिने झाले असून सप्टेंबरच्या सुरुवातीला जवळपास १२ ते १३ टन उत्पादन निघणार आहे.
----------------------------------
पंढरपूरच्या शेतकऱ्याचे मोलाचे मार्गदर्शन
भातशेतीऐवजी पेरू लागवडीचा एक नवीन प्रयोग केला आहे. हा प्रयोग यशस्वी होण्यासाठी संतोषला पंढरपूरचे धनाजीराव शिंदे या प्रगतशील शेतकऱ्याचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. महत्त्वाचे म्हणजे, शिंदे यांनी शेतीच्या बांधावर येऊन पेरू लागवडीचे प्रत्यक्ष मार्गदर्शन केले होते. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा मोठा फायदा फळ लागवडीसाठी झाला आहे.
-------------------------------
आठ ते दहा लाखांचे उत्पन्न
फळ खराब होऊ नये, यासाठी प्लॅस्टिकच्या पिशव्यांनी त्यांना बंदिस्त केले. सद्यस्थितीमध्ये दोन हजार २०० तैवान जातीचा पेरूच्या झाडांची लागवड केली आहे. एका झाडापासून किमान ५००-७०० रुपये उत्पन्न मिळणार आहे. तसेच १२-१३ टन उत्पादनातून कमीत कमी आठ ते दहा लाखांचे उत्पन्न मिळू शकणार आहे.
----------------------------------
शेतातून मिळणाऱ्या उत्पन्नावर शेतकरी लखपती होण्यास वेळ लागणार नाही; पण यासाठी योग्य नियोजन व योग्य मार्गदर्शन गरजेचे आहे. तरुणांनी आता शेतीकडे वळले पाहिजे.
- संतोष भोसले, शेतकरी
--------------------------------------