गोगावले यांची केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याशी भेट
गोगावले यांची केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याशी भेट
मुंबई–गोवा महामार्गावरील अपूर्ण कामांबाबत मागण्या मांडल्या
महाड, ता. १५ (बातमीदार) ः कोकणच्या आर्थिक विकासाचा, पर्यटनाचा आणि दळणवळणाचा कणा मानल्या जाणाऱ्या मुंबई–गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या अपूर्ण कामांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. कोलाड, महाड, वीर, माणगाव आदी परिसरात महामार्गावरील नियोजनाअभावी अपघातांचे प्रमाण वाढत असून नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन मंत्री भरत गोगावले यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन चार अत्यंत महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
या भेटीदरम्यान दोन्ही मंत्र्यांमध्ये महामार्गाच्या सद्यस्थितीवर सविस्तर चर्चा झाली. कोलाड परिसरात महामार्ग ओलांडताना आजही नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिक वाहतूक, औद्योगिक क्षेत्र आणि वाढती वर्दळ लक्षात घेता येथे वाहनांसाठी स्वतंत्र ‘व्हेईक्युलर अंडरपास’ उभारण्यात यावा, अशी मागणी मंत्री गोगावले यांनी केली. महाड शहरामध्ये स्थानिक वाहतूक आणि महामार्गावरील वेगवान वाहनांमध्ये स्पष्ट विभागणी नसल्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. यावर उपाय म्हणून गांधारपाले ते साहिलनगर दरम्यान स्वतंत्र सेवा रस्ता विकसित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. यामुळे महाड शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच वीर गाव आणि टोलनाका परिसरात कायमस्वरूपी वर्दळ असते. स्थानिक वाहने, दुकाने आणि महामार्गावरील वाहतूक यांचा संघर्ष वाढत असून, येथे स्वतंत्र सेवा रस्ता झाल्यास वाहतूक सुरळीत होऊन अपघातांना आळा बसेल, असे मंत्री गोगावले यांनी नमूद केले.
...............
कामे मार्गी लागण्याचे आश्वासन
माणगाव तालुक्यातील पहेल, खांडपाले, लाखपाले ते वडपाले या गावांच्या हद्दीत सलग सेवा रस्ता नसल्याने स्थानिक नागरिकांना महामार्गावर उतरावे लागते. त्यामुळे या संपूर्ण पट्ट्यात सलग सेवा रस्ता विकसित करण्याची मागणी करण्यात आली. स्थानिक नागरिकांची सुरक्षितता आणि प्रवाशांचा जीव वाचवणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे सांगत, नितीन गडकरी यांच्या सहकार्याने ही सर्व कामे लवकरच मार्गी लागतील, असा विश्वास मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

