किल्ले रायगड गडारोहण स्पर्धा
किल्ले रायगड गडारोहण स्पर्धा
स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त साहसवीरांना आव्हान
महाड, ता. २३ (बातमीदार) ः किल्ले रायगड पायी चढणे हे केवळ शारीरिक ताकदीचे नव्हे, तर मानसिक खंबीरतेचेही मोठे आव्हान मानले जाते. सुमारे १४०० पायऱ्या, अरुंद पाऊलवाटा, एका बाजूला खोल दऱ्या आणि दुसऱ्या बाजूला कातळकडे अशा खडतर मार्गावरून कमी वेळेत गड चढणे म्हणजे खऱ्या अर्थाने साहसाची परीक्षा आहे. या आव्हानाला सामोरे जाणाऱ्या साहसवीरांसाठी येत्या ११ जानेवारी २०२६ रोजी किल्ले रायगड गडारोहण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय युवक दिन व स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून ही स्पर्धा दरवर्षीप्रमाणे यंदाही किल्ले रायगड येथे आयोजित करण्यात येत आहे. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे तसेच स्थानिक उत्सव समिती, महाड यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा पार पडणार आहे. यंदा ही स्पर्धा एकूण सात गटांमध्ये घेण्यात येणार असून, प्रत्येक गटात प्रथम ते पाचवे क्रमांक अशी पाच बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धेचा मार्ग चित्त दरवाजा-महादरवाजा-होळीचा माळ असा निश्चित करण्यात आला आहे. स्पर्धेच्या दिवशी, रविवार ११ जानेवारी रोजी सकाळी ७.०० वाजता स्पर्धेस प्रारंभ होईल. स्पर्धकांची नावनोंदणी शनिवार, १० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता पाचाड धर्मशाळा येथे करण्यात येणार आहे. स्पर्धकांसाठी भोजनाची व्यवस्था विनामूल्य करण्यात आली असून, शनिवारी अल्पोपहार देण्यात येईल. रविवारी स्पर्धेनंतर पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे. विशेष म्हणजे, प्रथम क्रमांकाचे पारितोषिक शिवपुण्यतिथी दिनी, २ एप्रिल रोजी किल्ले रायगडावरील राजदरबारात प्रदान करण्यात येणार आहे. रायगडावर गडारोहण करून शौर्य, सहनशक्ती आणि राष्ट्रप्रेमाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ व स्थानिक उत्सव समिती, महाडचे अध्यक्ष त्रिंबक पुरोहित यांनी सर्व साहसप्रेमी युवक-युवतींना केले आहे.

