सोन्याचे भाव चढेच राहणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोन्याचे भाव चढेच राहणार
सोन्याचे भाव चढेच राहणार

सोन्याचे भाव चढेच राहणार

sakal_logo
By

मुंबई, ता. ३ ः या वर्षभरातही सोन्याचे भाव चढेच राहण्याची शक्यता असल्याचे मत ऑल इंडिया जेम्स ॲण्ड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे माजी अध्यक्ष आशीष पेठे आणि ‘सकाळ’कडे व्यक्त केले. या वर्षभरात असलेला लग्नाचा मोठा हंगाम तसेच जागतिक आर्थिक आणि भूराजकीय परिस्थिती डळमळीत असल्यामुळे सोन्याला आलेली मोठी मागणी, ही कारणे यामागे असल्याचे त्यांनी सांगितले.

मागील वर्षी जगात सर्वत्र झालेली व्याजदरवाढ आणि चलनवाढ यामुळे जगभरात सोन्याचे भाव मंदीत होते. तरीही केवळ भारतात रुपयाची मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्यामुळे सोन्याचे भाव टिकून राहिले होते, पण या वर्षी परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. युक्रेन युद्धालाही आता एक वर्ष होऊन गेल्यामुळे सध्याच्या सोन्याच्या भावात ती भीतीही सगळ्यांनी जमेस धरली आहे. आता व्याज दरवाढही फार तर एकदाच होईल अशी चिन्हे आहेत. त्यामुळे आता सोन्याच्या भावाबाबत बहुतेक नकारात्मक गोष्टी संपल्या असून आता एखादी एखादी चांगली बातमी आली की सोन्याचा भाव वाढू लागेल. टेक्निकल चार्टवरही सोने सध्या चांगले दिसत आहे, असेही पेठे म्हणाले.

सध्या अमेरिकेतही मंदीची भीती असून अशा अनिश्चित वातावरणात शेअर बाजार, मूल्यवान चलने या गुंतवणुकीतून लोक बाहेर पडून सोन्यात आपली गुंतवणूक करतात. अशा स्थितीत चलनवाढ, मंदी यामुळे सोन्याचा भाव वाढून भारतात या वर्षभरात तो अठ्ठावन्न ते साठ हजारांपर्यंत गेला तरीही आपल्याला आश्चर्य वाटणार नाही, असेही पेठे म्हणाले. गेल्या वर्षी सोन्याला खूप चांगली मागणी होती. गेल्या वर्षाच्या दिवाळीत तर अनेक वर्षांच्या दिवाळीपेक्षा, किंबहुना सन २०१९ पेक्षाही विक्री आणि मागणी खूपच छान होती. या वर्षी आठ महिने लग्नाचा हंगाम आहे. त्यामुळे सोन्याची विक्री वाढेल व तसे दरही वाढतेच राहतील. त्याचप्रमाणे औद्योगिक मागणी जास्त असल्यामुळे चांदीचेही दर वाढतील असेही पेठे म्हणाले.