
विश्व मराठी संमेलनाला उत्तम प्रतिसाद
मुंबई, ता. २ : देश-विदेशातील मराठी उद्योजक, साहित्यिक, कलावंतांना एकत्र आणणारे तीन दिवसीय पहिले विश्व मराठी संमेलन आजपासून वरळीच्या नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया येथे होत आहे. या संमेलनासाठी उपस्थित राहणाऱ्या प्रत्येकाला नावनोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. आज अखेरच्या दिवशी देश-विदेशातील तब्बल दोन हजारांहून अधिक जणांनी या संमेलनासाठी नावनोंदणी केली आहे.
‘मराठी तितुका मेळवावा’ या विश्व मराठी संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी केंद्रीय मंत्री पियूष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर उपस्थित राहणार आहेत. संमेलनास परदेशातील मराठी भाषेच्या प्रचार-प्रसार आणि संवर्धनासाठी योगदान देणारे ४९८ मराठी मंडळातील प्रतिनिधी, ६२ परदेशस्थ उद्योजक, ४७० परराज्यांतील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे प्रतिनिधी, १६४ राज्यांतील नामवंत साहित्यिक यांनी आपली नोंदणी केली आहे; तर सर्वसामान्य प्रेक्षकांमध्ये तब्बल हजारहून अधिक जणांनी संमेलनाला उपस्थित राहण्यासाठी प्रतिसाद नोंदवला आहे. या संमेलनासाठी उपस्थित राहू इच्छिणाऱ्यांना https://www.marathititukamelvava.com/nondani या लिंकवर नोंदणी करण्याचा पर्याय देण्यात आला असून प्रत्येक दिवशी उपस्थित राहण्याचे पर्याय त्यामध्ये देण्यात आले आहेत.
संमेलनाच्या पहिल्या दिवशी मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. त्यात तुळशी वृंदावन, ढोल-ताशा पथक, लेझीम पथक, दांडपट्टा-तलवारबाजी प्रात्यक्षिक होतील. कार्यक्रमाच्या तीनही दिवशी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.