मुख्य आणि टुडेसाठीची बातमी एकत्र आहे ...अंगणवाडी सेविकांची रात्र आझाद मैदानात आंदोलनाचा दुसरा दिवस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्य आणि टुडेसाठीची बातमी एकत्र आहे ...अंगणवाडी सेविकांची रात्र आझाद मैदानात  आंदोलनाचा दुसरा दिवस
मुख्य आणि टुडेसाठीची बातमी एकत्र आहे ...अंगणवाडी सेविकांची रात्र आझाद मैदानात आंदोलनाचा दुसरा दिवस

मुख्य आणि टुडेसाठीची बातमी एकत्र आहे ...अंगणवाडी सेविकांची रात्र आझाद मैदानात आंदोलनाचा दुसरा दिवस

sakal_logo
By

भर थंडीत उपाशीपोटी निर्धार ठाम!
खाण्यासाठी पैसे नसले तरी आंदोलन सुरू ठेवण्याचा अंगणवाडी सेविकांचा इशारा

भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : आंदोलनाच्या पहिल्या दिवशीच मुख्यमंत्र्यांची भेट होऊन घरी परतू, अशा आशेवर असलेल्या अंगणवाडी सेविकांना मंगळवारची रात्र आझाद मैदानातील कडकडीत थंडीत काढावी लागली. मुख्यमंत्री स्वत: शिष्टमंडळाची भेट घेत नाहीत तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही, असा आक्रमक निर्धार अंगणवाडी सेविकांनी आज पुन्हा एकदा बोलून दाखवला. कडाक्याच्या थंडीची तमा नाही. प्रसंगी आम्ही उपाशी राहू. आमच्याकडे खायला पैसे नसले तरी चालेल; पण आम्ही इथून हटणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
राज्याच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या अंगणवाडी सेविकांचे विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. जवळपास सहा ते सात हजारांहून अधिक अंगणवाडी सेविका आझाद मैदानात दुसऱ्या दिवशीही पाहायला मिळाल्या. मंगळवारच्या रात्री त्यांनी इथेच मुक्काम केला. शहरी भागात जवळ राहणाऱ्या अंगणवाडी सेविकांनी रात्री उशिरा आपले घर गाठले. सकाळी पुन्हा त्या आझाद मैदानात दाखल झाल्या. त्यांनी ग्रामीण भागातील सेविकांसाठी जेवणाचा डबाही आणला होता. त्यामुळे अंगणवाडी सेविकांची दुपारच्या जेवणाची सोय झाली. परिस्थिती कितीही बिकट झाली तरी चालेल; पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेने घेतला आहे.
दरम्यान, राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अंगणवाडी सेविकांना मंगळवारची रात्र आझाद मैदानात उघड्यावर काढावी लागेल याची कल्पनाही नव्हती. आम्ही इथे उपाशी असताना मुख्यमंत्री कसे झोपेत राहू शकतात, असा संतप्त सवाल अंगणवाडी सेविकांनी विचारला आहे.

मैदानात झोपायची वेळ येईल असे वाटले नव्हते!
आम्ही संपूर्ण रात्र मैदानात काढली. मैदान मोकळे असल्याने पोलिसांनी सहकार्य केले. रात्रीच्या जेवणाची सोय संघटनेकडून करण्यात आली होती. उघड्यावर आझाद मैदानावर झोपावे लागेल, असे कधीही वाटले नव्हते. आतापर्यंत आश्वासनांवरच जगत राहिलो. आता त्यातून कायमचा मार्ग मिळावा म्हणून आम्ही संघर्ष करत आहोत. मुख्यमंत्र्यांनी आमची भेट घ्यावी, आम्हाला वेतन द्यावे आणि शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा. आमच्या मागण्या मान्य करून त्याची अंमलबजावणी करावी.
- संगीता आंबेरकर, रत्नागिरी

साडेआठ हजारांत जगून दाखवावे
आम्ही सोमवारी रात्री आमचे घर सोडले. मंगळवारी सकाळी ५ वाजता आझाद मैदानात दाखल झालो. रात्री कडकडीत थंडीत इथे आम्ही राहिलो. घरातून निघताना फक्त एक चादर घेतली होती. आम्ही तयारीनिशी आलो नव्हतो. खोटी आश्वासने दिली. दिवाळी गोड होईल म्हणून सांगितले होते; पण सहा वर्षांत एक रुपयाही वाढ केलेली नाही. साडेआठ हजारांत मुख्यमंत्र्यांनी जगून दाखवावे. महिना कसा काढावा हे दाखवावे. आमचे काय हाल झालेत, ते आमचे आम्हाला माहीत. आम्ही आझाद मैदान सोडणार नाही.
- रुक्मिना पवार, यवतमाळ

आंघोळ नाही, फक्त चूळ भरली!
आम्ही त्र्यंबकेश्वरहून पहाटे निघालो. ठिय्या मोर्चा असल्याने दोन वेळचे जेवण निघायच्या रात्रीच करून ठेवले होते. माझ्यासोबत अशा अनेक महिला आहेत ज्या लहान मुलांना घरीच ठेवून आल्या आहेत. आंघोळ तर दूरच, फक्त चूळ भरली आणि नाश्ता केला. दुपारचे जेवण इथल्या महिलांनी आणलेल्या डब्यामुळे मिळाले. येताना फक्त प्रवासाचे पैसे आणले होते. बाहेरचे खाण्यासाठी तेवढे पैसेही नाहीत. मी ३८ वर्षांपासून सरकारची सेवा देत आहे. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही सरकारला धारेवर धरू.
- मोहिनी गाजरे, त्र्यंबकेश्वर

इथे राहण्याची व्यवस्था नाही
मोर्चाला आलो तेव्हा अनेक महिला होत्या. रात्री त्या घरी गेल्या आणि सकाळी पुन्हा मैदानात दाखल झाल्या, पण आम्ही दुरून आल्याने पुन्हा घरी जाणे शक्य नाही. आम्ही आमचे कुटुंब सोडून इथे आलो आहोत. आमच्याकडे इथे राहण्याशिवाय पर्याय नाही. ताडपत्रीच्या खाली असलेले दगड रात्रभर रुतत होते. माझ्या मुलीची प्रसूती व्हायची आहे. म्हातारे सासू-सासरे आहेत, पण सर्वच साडेआठ हजारांत होत नाही. त्यात आम्ही अडीच हजार रुपये खर्च करून इथे आलो. आमचे प्रश्न सुटलेच पाहिजेत.
- उषा यादव, सोलापूर

जगण्याइतपत पेन्शन द्यावे
माझे वय ६६ आहे. १९९२ पासून मी अंगणवाडी सेवा म्हणून काम करते. तुटपुंज्या मानधनावर सेवेत असताना काम केले. आता निवृत्त झाल्यानंतरही पेन्शन नाही. लोकांचे पैसे व्याजाने काढून आणले. पाचशे रुपये तर फक्त गाडीभाड्याचा खर्च झाला. घरून आणलेल्या पोळ्याही खराब झाल्या. महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारचीही आहे. त्यांनी आमची काळजी घ्यायला हवी.
- अरुणा अलोणे, उमरखेड, यवतमाळ