
तंत्रज्ञान विद्यापीठाने संशोधनावर भर द्यावा ः पाटील
मुंबई, ता. ६ : शिक्षणातून नोकरी व उद्योजकता वाढीस लागणे, हे या क्षेत्राचे यश आहे. बदलत्या काळानुसार जीवन सुखकर आणि जागतिक पातळीवर ओळख निर्माण होईल, अशा संशोधनावर भर देण्याचे निर्देश देतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाने आवश्यक शैक्षणिक सुधारणा कराव्यात, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. सिडनहॅम महाविद्यालयात पाटील यांच्या अध्यक्षतेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे बळकटीकरण आणि विविध समस्यांबाबत आढावा बैठक झाली. विद्यापीठाच्या बळकटीकरणासाठी प्रादेशिक केंद्र आणि उपकेंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे मंत्री पाटील यांनी सांगितले. या वेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, कुलसचिव भगवान जोशी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.