
मर्सिडीज बेंझची विक्रमी विक्री
मुंबई, ता. ८ ः आरामदायी व आलिशान गाड्या बनवणाऱ्या मर्सिडीज बेंझ कंपनीने २०२२ या वर्षात मोटार विक्रीचा विक्रम केला आहे. त्यांनी २०२१ च्या तुलनेत ४१ टक्के जास्त गाड्या विकल्या आहेत.
कंपनीने २०२२ मध्ये १५, ८२२ गाड्या विकल्या. त्यांनी २०२१ मध्ये ११,२४२ गाड्या विकल्या होत्या. कोरोना तसेच सुट्या भागांची टंचाई, प्रतिकूल जागतिक परिस्थिती यावर मात करून कंपनीने ही कामगिरी केल्याचे एमडी व सीईओ संतोष अय्यर म्हणाले. कंपनीने फास्ट चार्जिंगचा विस्तार देशात केला असून आता ३५ अल्ट्राफास्ट चार्जर सेवेत आहेत. कंपनीचा चाकण प्रकल्प २०२२ पासून शंभर टक्के हरित ऊर्जेवर चालत असून आमचे एक तृतीयांश भागीदारही या वर्षअखेरीस हरित ऊर्जेवर आपले कामकाज करतील, असेही अय्यर म्हणाले. कंपनीच्या सी क्लास, ई क्लास, एस क्लास लिमोझीन, जीएलए, जीएलसी, जीएलई व जीएलएस एसयूव्ही या गाड्यांची विक्री या वर्षी वाढली. यातही एलडब्ल्यूबी ई क्लासची विक्री सर्वात जास्त झाली. त्याखालोखाल जीएलसी एसयूव्हीची विक्री झाली.