
जॉन्सन पावडरची नव्याने चाचणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : आरोग्यासाठी घातक असल्याचा ठपका ठेवल्याने अडचणीत आलेल्या जॉन्सन बेबी टाल्कम पावडरची विद्यमान मार्गदर्शक तत्त्वाच्या आधारे नव्याने चाचणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला दिले आहेत. तसेच अहवाल प्रतिकूल असल्यास कंपनीविरोधात तातडीने कारवाई करण्याचे आदेशही सरकारला देण्यात आले. दरम्यान, बेबी पावडरचा जमा झालेला साठा विक्री करण्याची जॉन्सनची मागणी खंडपीठाने फेटाळून लावली आहे. सरकारने विद्यमान नियमावलीचा आधारावर नमुन्यांची नव्याने चाचणी घ्यावी, तसेच परिणाम प्रतिकूल असल्यास कंपनीवर त्वरित कारवाई करावी, असे खंडपीठाने स्पष्ट केले. तसेच पावडरचे नमुने घेतल्यानंतर निकाल मिळताच एका आठवड्याच्या आत कारवाई करण्याचे आदेशही खंडपीठाने राज्य सरकारला दिले. आम्ही हे औषध कंपनीच्या दृष्टिकोनातून नाही, तर ग्राहकांच्या दृष्टिकोनातून हे निर्देश दिल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने पुढील सुनावणी ९ जानेवारीला निश्चित केली आहे.