विदेशातील मराठीजणांचे भाषाप्रेम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विदेशातील मराठीजणांचे भाषाप्रेम
विदेशातील मराठीजणांचे भाषाप्रेम

विदेशातील मराठीजणांचे भाषाप्रेम

sakal_logo
By

संजीव भागवत ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ ः मुंबईमध्ये पार पडलेल्या विश्व मराठी संमेलनासाठी ४२ देशांतून ३४० जण आले होते. यातील २७६ जणांनी सरकारकडून देण्यात येणारे मानधन नाकारले आहे. आम्ही केवळ मराठी भाषा, देशप्रेम यासाठी आलो आणि कार्यक्रमामुळे भारावून गेलो. त्यामुळे शासनाकडून आम्हाला पैसे नको. हवे तर दरवर्षी अशा कार्यक्रमाला आमच्या पैशाने येऊ, अशा भावना विदेशातील मराठी भाषकांकडून व्यक्त करण्यात आल्या.

४ ते ६ जानेवारीदरम्यान मुंबईत मराठी भाषा विभागाकडून विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनासाठी जगभरातील ४२ देशांतील ५०८ जणांनी नोंदणी केली होती; मात्र त्यापैकी ३४० जण या संमेलनासाठी उपस्थित राहिले होते. त्यामध्ये अमेरिकेतून आलेल्या प्रत्येकाला सव्वा लाख रुपये आणि इतर देशांतील नागरिकांना ७५ हजार रुपयांचे मानधन देण्याचे नियोजन होते; तर देशातील इतर राज्यांतून आलेल्या प्रत्येक मराठी भाषिकांना ५० हजार रुपये इतके मानधन देण्याचे ठरले होते. त्यातील परदेशातून आलेल्या केवळ ६४ जणांनीच मानधनासाठी आपली कागदपत्रे जमा केली असल्याची माहिती समोर आली आहे; तर इतर राज्यांतून आलेल्या केवळ ४५ जणांनी आपली कागदपत्रे जमा केली. मराठी भाषकांनी आपले मानधन घ्यावे, म्हणून आयोजकांकडून संमेलनस्थळी वेळोवेळी आवाहनही केले जात होते. मुंबईत या संमेलनासाठी केवळ आम्ही महाराष्ट्र आणि मराठीप्रेमासाठी आलो होतो. त्यामुळे तीन दिवस आम्ही या कार्यक्रमात रंगून गेलो असल्याचे मराठी भाषकांनी सांगितले.
--
विविध ठिकाणांहून उपस्थिती
अमेरिकेतून बृहन्महाराष्ट्र मंडळ आणि इतर विविध संस्थांकडून १२० जण आले होते; तर युरोपातील विविध देशातून ८२ जणांची नोंद या संमेलनासाठी झाली होती. त्याशिवाय ऑस्ट्रेलियातील १२ आणि लंडन, जापान, जर्मनी आदी देशांतील ३४० हून अधिक जण या संमेलनाला उपस्थित होते.
--
सरकारने मुंबईत आलेल्या मराठी भाषकांना अडचणी येऊ नयेत म्हणून अनुदान जाहीर केले होते; परंतु ते न घेता त्यांनी आपला दिलदारपणा दाखवून दिला. ते पैशापोटी नाही, तर मराठी भाषा आणि मराठी भाषा संस्कृतीच्या प्रेमापोटी आले होते. हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.
- प्रा. क्षितिज पाटुकले, संस्थापक अध्यक्ष, विश्व मराठी परिषद