अनधिकृत शाळा बंद करण्याचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनधिकृत शाळा बंद करण्याचे आदेश
अनधिकृत शाळा बंद करण्याचे आदेश

अनधिकृत शाळा बंद करण्याचे आदेश

sakal_logo
By

मुंबई, ता. १० : शालेय शिक्षण विभागाची कोणतीही मान्यता न घेता राज्यभरात ६७४ शाळा अनधिकृतरीत्या सुरू आहेत. या शाळा शैक्षणिक वर्ष संपायच्या अगोदर बंद करा, असे आदेश शिक्षण संचालकाने राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. अनधिकृतपणे सुरू असलेल्या सर्वाधिक शाळा मुंबईत आहेत. मुंबई महापालिका क्षेत्रात २२३ तर डीवायडी अंतर्गत १६ शाळा अनधिकृत आहेत. अनधिकृत शाळांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) अधिनियमातील नियम १० नुसार कारवाई केली जाणार असल्याचे संचालकांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संचालक कार्यालयाकडून अनधिकृत शाळांची गंभीर दखल घेण्यात आली आहे. राज्यात ५६० प्राथमिक; तर ११४ माध्यमिक अशा एकूण ६७४ शाळा अनधिकृतरीत्या सुरू आहेत. त्या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलांचे कोणतेही नुकसान होणार नाही. या शाळांवर आरटीई कलम १८(५) नुसार कारवाई केली जाणार आहे; मात्र या शाळा हे शैक्षणिक वर्ष संपायच्या आत शाळा बंद करा, असे आदेश राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षकांना दिले आहेत.

मुंबईसह राज्यात विविध ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात अनाथ ग्रुप शाळा सुरू असतात; मात्र त्यांच्यावर कारवाई होत नाही. अधिकारी आणि संस्थाचालक यांच्या संगनमतामुळे या शाळा पुढील काळात नियमित कशा होतात, असा प्रश्न पालक संघटनांकडून उपस्थित केला जात आहे. ज्या शाळांनी सरकारची कोणतीही मान्यता न घेता आपला कारभार सुरू केला, अशा शाळा आणि त्यांच्या संस्थाचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत; अन्यथा हा पायंडा असाच सुरू राहील, अशी मागणी पालक संघटनांकडून केली जात आहे.