Digital University
Digital UniversitySakal

Digital University : राज्यात डिजिटल विद्यापीठाचे युग अवतरणार

२०० हून अधिक अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देणारे पहिले डिजिटल विद्यापीठ राज्यात स्थापन होणार

मुंबई : पदवी आणि पदवीधर अभ्यासक्रमाबरोबरच इतर पदविका स्तरावरील तब्बल २०० हून अधिक अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देणारे पहिले डिजिटल विद्यापीठ राज्यात स्थापन होणार आहे.

‘महाराष्ट्र डिजिटल विद्यापीठ’ स्थापन करण्यासाठी माजी कुलगुरू प्रा. रघुनाथ शेवगावकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल नुकताच सरकारला सादर केला.

या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अहवालावर आढावा घेतला. डिजिटल विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात आवश्यक कार्यपद्धती आणि इतर निर्णयही घेतले जाणार असल्याचे जाहीर केले.

विद्यापीठाच्या एकूण निर्मितीसाठी त्यातील अभ्यासक्रम, पायाभूत सुविधा, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मान्यता आदींचा विचार करण्यासाठी बराच वेळ लागणार असल्याने हे विद्यापीठ पुढील वर्षी सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोविड कालावधीत विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेतले. यामुळे त्यांच्या शिक्षणात कोणताही खंड पडला नाही. माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ शकत नाही, अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र डिजिटल विद्यापीठाच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होईल, असे शिक्षणमंत्री पाटील यांनी सांगितले.

राज्यातील डिजिटल विद्यापीठ जगातील दुसरे ऑनलाईन विद्यापीठ असेल. प्रवेश प्रक्रिया, शिक्षणक्रम, परीक्षा, निकाल या सर्व बाबी ऑनलाईन पद्धतीने पूर्ण होतील. जगातील कोणताही विद्यार्थी या विद्यापीठात प्रवेश घेऊ शकेल.

विद्यापीठ स्थापनेच्या कायद्याप्रमाणेच या विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी गठित समितीने अहवाल सादर करावा, असे निर्देशही पाटील यांनी दिले आहेत. या विद्यापीठामुळे राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यास मदत होणार असल्याचा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

डिजिटल विद्यापीठामुळे...
- ग्रामीण भागातील आणि व्यवसाय करून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण
- रोजगारासाठी लागणारी कला व कौशल्य आदींचे ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण
- विद्यापीठाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण व शहरी भागात शैक्षणिक केंद्र सुरू करण्यात येईल
- लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम (एलएमएस) व कॉम्पिटन्सी मॅनेजमेंट सिस्टीमद्वारे (सीएमएस) शैक्षणिक गुणवत्ता तपासणी
- विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक प्रशिक्षण देण्यात येईल.

अन्य विभागांचा आढावा
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातील ऐतिहासिक दोलामुद्रिते, दुर्मिळ ग्रंथ, नियतकालिकांचे संच, वर्तमानपत्रे, साप्ताहिके, हस्तलिखिते यांच्या डिजिटायझेशन, जतन, संरक्षण, संवर्धनासंदर्भात आढावा शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या वेळी घेतला.

तसेच सहकारी सूतगिरण्यांच्या व यंत्रमाग संस्थांच्या अडचणींबाबतही पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या वेळी आमदार अमरिश पटेल, प्रकाश आवाडे, कुणाल पाटील, वस्त्रोद्योग विभागाचे सचिव वीरेंद्र सिंग, वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे आयुक्त पी. शिव शंकर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com