
नॅशनल ऑईलसीड मिशनवर केंद्र सरकारने भर द्यावा
मुंबई, ता. १५ : अन्नसुरक्षेप्रमाणेच खाद्यतेल सुरक्षेसाठी केंद्र सरकारने तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी नॅशनल ऑईलसीड मिशनवर भर द्यावा, अशी अपेक्षा तेल उत्पादक व व्यापाऱ्यांची सर्वोच्च संघटना असलेल्या एसईएचे माजी अध्यक्ष अतुल चतुर्वेदी यांनी सकाळकडे व्यक्त केली.
सध्या देशाचा वर्षभराचा खाद्यतेलाचा खप २.३ कोटी टन आहे. त्यातील दीड कोटी टन खाद्यतेल आयात होते व त्यापोटी देशाचे दीड लाख कोटी रुपये खर्च होतात. हा खप दरवर्षी सुमारे सात लाख टनांनी वाढतो आहे. त्यामुळे आपले देशांतर्गत उत्पादनही वाढवले नाही, तर ती आपल्या खाद्यतेलविषयक सुरक्षेशी तडजोड केल्यासारखे होईल, असेही त्यांनी दाखवून दिले.
तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी केंद्राने मोहरीच्या आणि पाम तेलाच्या उत्पादनावर भर द्यावा, त्यासाठी त्यांच्या लागवडीला अनुदान-अर्थसाह्य द्यावे. आपण गहू-तांदळाचे उत्पादन एवढे वाढवले, की ते ठेवायला जागा नाही आणि दुसरीकडे खाद्यतेलाच्या आयातीसाठी परकीय चलन खर्च होते, हा विरोधाभास आहे. सरकारने अन्नसुरक्षेची व्याख्या बदलून त्यात खाद्यतेल तसेच डाळी-कडधान्ये यांचाही समावेश करावा, अशीही मागणी सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशनतर्फे सरकारकडे करण्यात आल्याचेही चतुर्वेदी यांनी सांगितले.