अण्णा भाऊ साठेंचे साहित्य डिजिटल रुपात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अण्णा भाऊ साठेंचे साहित्य डिजिटल रुपात
अण्णा भाऊ साठेंचे साहित्य डिजिटल रुपात

अण्णा भाऊ साठेंचे साहित्य डिजिटल रुपात

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १४ : महाराष्ट्र शासनाच्या ‘साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समिती’च्या वतीने अण्णा भाऊ साठे यांच्या दोन कादंबरी खंडांचे ऑडिओ व ई-बुक प्रसारण लवकरच होणार आहे. त्याची सर्व तयारी पूर्ण झाल्याने अण्णा भाऊ साठे यांचे सर्व साहित्य डिजिटल स्वरूपात वाचकांना उपलब्ध होणार असल्याची माहिती समितीचे सदस्य सचिव डॉ. संजय शिंदे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीची मागील आठ महिन्यांत एकही बैठक झाली नसल्याने ‘अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची उपेक्षा’ या मथळ्याखाली ६ जानेवारीला ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर उच्च शिक्षण विभागाने त्याची गंभीर दखल घेत समितीच्या कामकाजाचा आढावा घेत त्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर अण्णा भाऊ साठे यांच्या दोन कादंबरी खंडांचे ऑडिओ व ई-बुक प्रसारण लवकरच होणार आहे.

येत्या काळात अण्णा भाऊ साठे यांच्या २० कांदबऱ्या व कथा तमाम मराठी रसिकांना ऑडिओ स्वरूपात ऐकता येणार आहेत व ई-बुक स्वरूपात मोबाईलमध्ये वाचताही येणार आहेत. याकामी ‘पुस्तक मार्केट डॉट कॉम’ प्रकाशनने विशेष पुढाकार घेतला आहे. ही सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती समितीचे सदस्य डॉ. शरद गायकवाड यांनी दिली.

‘पुस्तक मार्केट’वर ऐका कादंबऱ्या
पुस्तकांच्या ऑडिओ रेकॉर्डिंगचे काम मागील वर्षभर सुरू होते. नगर आकाशवाणीच्या महेश्वरी अविनाश आणि अतुल सातपुते यांनी कादंबऱ्यांचे अभिवाचन आणि ध्वनिमुद्रण केले आहे. या नव्या वर्षात तमाम वाचकांना अण्णा भाऊ साठे यांच्या कादंबऱ्या ऐकण्याची संधी ‘पुस्तक मार्केट’ अॅपवर मिळणार आहे, अशी माहिती प्रकाशन समितीचे सदस्य डॉ. मिलिंद कसबे यांनी दिली.