
पर्यावरणपूरक पाम तेलासाठी ‘गोदरेज ॲग्रोव्हेट’ला पुरस्कार
मुंबई, ता. १६ : पर्यावरणपूरक पाम तेल उत्पादन प्रक्रियेबद्दल ‘गोदरेज अॅग्रोव्हेट’ला ‘इंडियन पाम ऑईल सस्टेनिबिलिटी फ्रेवर्क’ अंतर्गत विशेष प्रमाणपत्र मिळाले आहे. एका स्वायत्त आंतरराष्ट्रीय मानांकन संस्थेद्वारे तपासणी करून हे प्रमाणपत्र देण्यात आले. गोदरेजच्या पाम ऑइल प्लांटेशन व्यवसायाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौगता नियोगी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. असे प्रमाणपत्र मिळवणारी गोदरेज ॲग्रोव्हेट ही देशातील पहिलीच कंपनी आहे. पाम तेलाची उत्पादनप्रक्रिया तसेच लागवड याबाबत समाजाला उपयोगी ठरणाऱ्या, आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य असलेल्या आणि पर्यावरणपूरक कामकाज, मार्गदर्शक तत्त्वे यांचे पालन करणाऱ्या कंपनीला हे प्रमाणपत्र दिले जाते. पामवृक्षांची लागवड पर्यावरणपूरक पद्धतीने कशी करावी, याचे प्रशिक्षणही शेतकऱ्यांना या प्रक्रियेद्वारे दिले जाते. पर्यावरणपूरक पद्धतीने पाम वृक्षांची लागवड करण्याबाबत कंपनीने देशातील अनेक राज्यांबरोबर करारही केले आहेत.