
मालवणी येथे खारफुटीवर अवैध भराव
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : एका बाजूला मुंबईतील वनसंपदा वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असताना दुसऱ्या बाजूला मात्र निसर्गावर घाला घालण्याचे काम सुरू आहे. मालवणी येथील खारफुटींवर मोठ्या प्रमाणावर भराव टाकला जात आहे. यामुळे खारफुटीचा मोठा पट्टा नामशेष होण्याची भीती पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते गॉडफ्रे पिमेंटा यांनी मुख्यमंत्री, पर्यावरण विभाग तसेच मँग्रोव्हज सेलकडे तक्रार केली आहे.
मालवणी परिसरातील खाडीकिनारी खारफुटीचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे जैवविविधता आणि पशू-पक्ष्यांचे अस्तित्वही या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर असते; परंतु परिसरातील खारफुटीमध्ये भराव टाकून बांधकाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मालवणी येथील खारफुटीवर सीटीएस क्र. २ शी संबंधित सर्व्हे क्र. २६३ वर मोठ्या प्रमाणात डम्पिंग होत आहे. येथील जागा मालकाकडून खारफुटीची कत्तल केली जात असून, बांधकामासाठी लोखंड आणल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. त्यामुळे येथील जैवविविधतेला बाधा पहोचण्याची भीती निर्माण झाली आहे. ही अतिशय गंभीर समस्या असल्याचे पिमेंटा म्हणाले.
निसर्गचक्र धोक्यात येण्याची भीती
खारफुटी परिसरात होत असलेल्या अतिक्रमणामुळे जैवविविधतेबरोबरच इतर गोष्टींवरदेखील परिणाम जाणवतो. यामुळे स्थानिकांची मच्छीमारी धोक्यात आली आहे. विशेषत: जेव्हा संपूर्ण मासेमारी समुदाय कोस्टल रोड रिक्लेमेशन, कोस्टल वॉटरचे प्रदूषण आदींमुळे गंभीर समस्यांना तोंड देत आहे. खारफुटीमध्ये कचरा टाकल्याने नाजूक परिसंस्थेचा नाश होतो. चक्रीवादळ आणि किनारी धूप इत्यादी दरम्यान खारफुटी हे ‘बजर झोन’ म्हणून काम करतात. हे चक्रही धोक्यात येण्याचा शक्यता व्यक्त होत आहे.