
काँक्रिटीकरणाची कामे नियमानुसारच
मुंबई, ता. १८ : मुंबई महापालिकेच्या वतीने नियोजित ३९७ किलोमीटर लांबीच्या रस्ते काँक्रीटीकरण कामांमध्ये निश्चित कार्यपद्धती आणि नियमानुसारच कार्यवाही करण्यात येत आहे. या प्रक्रियेमध्ये निविदेतील निकषानुसार सर्व कंत्राटदार पात्र ठरले आहेत. रस्ते कामांचा कालावधी ठरवताना ‘काँक्रीट क्युरिंग टाइम’ आणि वाहतूक समन्वयासह सर्व बाबी लक्षात घेऊन तो निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे एकूणच नियोजित रस्ते सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे, त्याची प्रशासकीय कार्यवाही, निविदा प्रक्रिया या सर्व बाबींमध्ये निकष पाळले जात असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी महापालिकेच्या या नियोजित कामाबाबत आरोप केले होते. त्यावर महापालिकेने खुलासा केला.
महापालिका प्रशासनाने म्हटले, रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या कामाची अंदाजपत्रके सुधारित ‘एसओआर’प्रमाणे तयार करण्यात आली होती. त्यानुसार निविदा काढण्यात आल्या असून सदर कार्यालयीन अंदाजित खर्चावर कंत्राटदारांनी अधिक बोली लावलेली आहे; मात्र वाटाघाटीअंती सममूल्य दराने कंत्राट देण्याचे प्रस्तावित करण्यात आलेले आहे.
२०१८ च्या दरसूचीमधील दर हे वस्तू व सेवा करांसह निश्चित करण्यात आले होते, परंतु वस्तू व सेवा कर केंद्राकडून वेळोवेळी बदलण्यात येतात. त्यामुळे सुधारित दर सूची ही वस्तू व सेवा कर वगळून तयार केली आहे. याशिवाय सर्व निविदा प्रक्रिया ही मनपाच्या ई-निविदा प्रणालीमार्फत करण्यात आलेली असून पूर्ण गोपनीयता बाळगून करण्यात येते. सदर प्रक्रियेमध्ये कोणी व किती निविदा भरल्या, यावर मनपाचा कोणताही अंकुश नसतो. प्रतिसाद म्हणून पात्र झालेल्या निविदांची पडताळणी करून लघुत्तम निविदाकारास संबंधित निविदेकरिता कार्यादेश देण्याची कार्यवाही करण्यात आली आहे, असेही महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
----
२४ महिन्यांचा कालावधी निश्चित
सदर निविदेसाठी आवश्यक चांगल्या गुणवत्तेच्या कामांच्या अनुभवाची पाचही कंत्राटदारांची कागदपत्रे प्रशासनाद्वारे पडताळण्यात आली असून सदर कंत्राटदार पात्र ठरले आहेत. सदर कामाकरिता नमूद केलेला २४ महिन्यांचा (पावसाळा वगळून) कालावधी काँक्रीट क्युरिंग टाइम व वाहतूक समन्वयानुसार योग्य धरण्यात आलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी चुकीच्या वृत्तांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.