स्थानिक सुट्या घेण्यास मज्जाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्थानिक सुट्या घेण्यास मज्जाव
स्थानिक सुट्या घेण्यास मज्जाव

स्थानिक सुट्या घेण्यास मज्जाव

sakal_logo
By

मुंबई, ता. १९ : शिक्षण विभागाकडून विविध सण-उत्सवांनिनित्त शाळांना सुट्या दिल्या जातात, परंतु काही शाळा आणि संस्थाचालकांकडून यातील काही सुट्या हव्या त्या वेळी घेतल्या जात असल्याचा प्रकार सुरू झाला आहे. त्यावर लगाम घालण्यासाठी स्थानिक सुट्यांबाबत शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी नव्या सूचना जारी केल्या आहेत.
राज्यातील सरकारी शालेय सहल, वार्षिकोत्सव, शालेय स्तरावर होणाऱ्या इतर कार्यक्रमांनंतर तसेच खासगी अनुदानित शाळांमध्ये संस्थाचालकांचे वाढदिवस, लग्नकार्य, निवडणूक प्रचार यासारख्या कार्यक्रमांनिमित्त शाळांना सुट्टी देण्यात येते. हे प्रकार थांबवण्यासाठी शिक्षण आयुक्तालयाने वरील आदेश जारी केले. त्यानुसार शाळांना आता कधीही सुट्या घेण्यापूर्वी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. तसेच शाळेच्या सुट्टीमुळे विभागातील महत्त्वाचे दौरे, कार्यक्रमाच्या आयोजनात अडसर होणार नाही याचीही काळजी शाळांनी घ्यावी, असे मांढरे यांनी स्पष्ट केले आहे.
---
‘प्रचारी’ शिक्षकांवर कारवाई!
राज्यात सध्या काही शिक्षक मतदारसंघांत निवडणूक प्रचार सुरू आहे. त्यानिमित्त अनेक खासगी आणि अनुदानित शाळांतील शिक्षकांना संस्थाचालकांनी प्रचारासाठी कामाला लावले आहे; तर काही शाळांना लवकर सुट्या दिल्या जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि अध्यापनावर मोठे परिणाम होत असल्याने प्रचारासाठी फिरणाऱ्या शिक्षकांवर कारवाई केली जाणार असल्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी सांगितले.