
मलिकांवर उपचारासाठी किडनीतज्ज्ञांची यादी सादर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : मागील सुमारे वर्षभरापासून कारागृहात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर उपचार करण्यासाठी तीन किडनीतज्ज्ञ डॉक्टरांची यादी आज विशेष न्यायालयात देण्यात आली. यावर लवकरच न्यायालय निर्णय देणार आहे.
मलिक सध्या किडनीविकाराने त्रस्त असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार होणे आवश्यक असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले. या पाश्र्वभूमीवर आज तीन नेफ्ट्रोलॉजिस्टची नावे सादर करण्यात आली. यापैकी एक नाव न्यायालय निश्चित करणार आहे. पुढील सुनावणी २ फेब्रुवारीला होणार असून, त्या वेळी वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे आदेशदेखील न्यायालयाने दिले आहेत. ईडीने या तपासणीला विरोध केला आहे. मागील सहा महिने मलिक या आजाराने त्रस्त आहेत, असे वैद्यकीय अहवालात म्हटले आहे.