वाघाटी संवर्धन केंद्राचे काम पूर्ण :

वाघाटी संवर्धन केंद्राचे काम पूर्ण :

Published on

राष्ट्रीय उद्यानात आता
वाघाटीचे संवर्धन
केंद्राचे काम पूर्ण

बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ‘रस्टी स्पॉटेड कॅट’ म्हणजेच दुर्मिळ प्राणी असलेल्या वाघाटीचे प्रजनन आणि संवर्धन केंद्र सुरू झाले आहे. केंद्रातील आठही पिंजऱ्यांचे काम पूर्ण झाले असून वाघाटीच्या संवर्धनासाठी ते सज्ज झाले आहेत. वाघाटी सापडल्यास त्या केंद्रात आणून देण्याचे आवाहन राष्ट्रीय उद्यान प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मार्जार कुळातीचे उत्पत्तिस्थान म्हणून वाघाटीची ओळख आहे. असे असले तरी वाघाटी सर्वांत दुर्मिळ प्राणी म्हणून गणला जातो. वाघाटीची नोंद इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर (आययूसीएन)द्वारे जारी केलेल्या धोकादायक स्थितीत आणि नामशेष होत असलेल्या प्राण्यांच्या यादीत आहे. त्यामुळे वाघाटीची संख्या वाढवण्यासाठी राष्ट्रीय उद्यानाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीच उद्यानातील घनदाट जंगलात संवर्धन केंद्र तयार करण्यात आले आहे.
राष्ट्रीय उद्यानात २००९-१० पासून वाघाटीचे प्रजनन आणि संवर्धन करण्यास सुरुवात झाली; मात्र प्रकल्पाला फारसे यश मिळाले नाही. संवर्धन केंद्र वाघांच्या पिंजऱ्याच्या परिसरात आहे. वाघांच्या वासाने वाघाटींचे प्रजनन होत नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळे उद्यानातील घनदाट जंगल असणाऱ्या परिसरात संवर्धन केंद्र तयार करण्यात आले आहे. उसाच्या फडात वाघाटी येत असल्याने संवर्धन केंद्रातही उसाची लागवड केली गेली आहे. केंद्राला नैसर्गिक अधिवासासारखे रूप यावे म्हणून चारही बाजूंनी जाळीची भिंत तयार करण्यात आली आहे. त्यामुळे वाघाटीसाठी नैसर्गिक वातावरण तयार झाले आहे. पिंजऱ्याच्या आत वाघाटीला लपण्यासाठी पोकळ झाडाचे खोड ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर फिरण्यासाठी मोकळी जागा उपलब्ध करण्यात आली असून त्यातही उसाची लागवड केली गेली आहे. तिथे लाकडाचे ओंडके ठेवण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रीय उद्यानातील अधिकाऱ्यांनी दिली.

साताऱ्यातून वाघाटी आणण्याचा प्रयत्न
राष्ट्रीय उद्यानातील संगोपन केंद्रात सध्या तीन वाघाटी आहेत. पुण्याहून पाच वर्षांची नर-मादी जोडी आणण्यात आली आहे. सांगलीमधील शिराळा परिसरातून तीन महिन्यांचे एक पिल्लू राष्ट्रीय उद्यानात आणले आहे. साताऱ्यातील कराडमध्ये एका उसाच्या शिवारात ऊसतोड सुरू असताना, दुर्मिळ असलेल्या वाघाटीची दोन पिल्ले आढळून आली. सध्या त्यांची देखभाल आणि संगोपन सातारा वन विभागाद्वारे केले जात आहे; मात्र दोन्ही पिल्ले मोठी झाल्यावर त्यांना राष्ट्रीय उद्यानातील वाघाटी संवर्धन केंद्रात आणण्याची योजना आहे. तशी मागणी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com