संविधान ध्रुव ताऱ्याप्रमाणे मार्गदर्शक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संविधान ध्रुव ताऱ्याप्रमाणे मार्गदर्शक
संविधान ध्रुव ताऱ्याप्रमाणे मार्गदर्शक

संविधान ध्रुव ताऱ्याप्रमाणे मार्गदर्शक

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : आपले संविधान ध्रुव ताऱ्याप्रमाणे मार्गदर्शक आहे आणि जेव्हा जटिल प्रसंग निर्माण होतो, तेव्हा ते चोख मार्गदर्शक ठरते. संविधानाचा गाभा अबाधित ठेवून काळानुरूप कायद्याच्या अनुसरून काम करणे, हे न्यायाधीशांचे कौशल्य आहे, असे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड म्हणाले. ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ नानी पालखीवाला यांनी कायदा आणि अर्थशास्त्रात केलेल्या योगदानामुळे देशाच्या समकालीन आर्थिक आणि कायदासंबंधित इतिहासात अनमोल भरच पडली आहे, असे कौतुकोद्गार त्यांनी काढले.

नानी पालखीवाला स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित व्याख्यान सोहळ्यात सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी आज (ता. २१) उपस्थितांना मार्गदर्शन केले. बॉम्बे बार असोसिएशनच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या या व्याख्यानमालेचे यंदाचे अठरावे वर्ष आहे. पालखीवाला यांच्या विविध गुणांचा परामर्श त्यांनी भाषणात केला. नानी पालखीवाला यांचा अर्थशास्त्राचा अभ्यास गाढा होता. वकील आणि अर्थतज्ज्ञ अशा दोन्ही क्षेत्रांत त्यांचा व्यासंग दांडगा होता. राज्यघटनेने नागरिकांना दिलेल्या अधिकारांचे रक्षण करण्याकडे त्यांचा कल होता. व्यक्ती स्वातंत्र्याचा त्यांनी नेहमीच पुरस्कार केला आणि तत्कालीन सरकारच्या परवाना राजलादेखील त्यांनी विरोध केला होता, असे प्रतिपादन डॉ. चंद्रचूड यांनी केले.

क्रिकेट सामन्यापेक्षा व्याख्यानाला गर्दी
सर्वोच्च न्यायालयात आतापर्यंत झालेल्या सर्वात मोठ्या १३ न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे पालखीवाला यांनी केलेल्या युक्तिवादाच्या आठवणीही चंद्रचूड यांनी जागविल्या. ते एक उत्कृष्ट वक्ता म्हणून लोकप्रिय होते आणि कायद्याचा अभ्यास करणारे विद्यार्थी आणि वकील वर्ग त्यांची व्याख्याने ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी करत. क्रिकेट सामन्यापेक्षा अधिक गर्दी त्यांच्या व्याख्यानासाठी असायची, असे सांगत ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या व्याख्यानाची आठवण त्यांनी सांगितली.