एचबीटी दवाखान्यांची संख्या शतकापार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एचबीटी दवाखान्यांची संख्या शतकापार
एचबीटी दवाखान्यांची संख्या शतकापार

एचबीटी दवाखान्यांची संख्या शतकापार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २५ : मुंबईकरांच्या आरोग्य सेवेसाठी महापालिकेने सुरू केलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यां’च्या (एचबीटी) संख्येने आता शतक ओलांडले आहे. प्रजासत्ताक दिन अर्थात २६ जानेवारीपर्यंत किमान १०० दवाखाने सुरू होतील, असे महापालिकेने वचन दिले होते. हे वचन पूर्ण करीत प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ही संख्या १०६ इतकी झाली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांनी दिली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या १७ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेचे लोकार्पण करण्यात आले होते. त्या वेळी ५२ दवाखाने कार्यरत झाले होते. यानंतर नुकतेच मुंबई दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणखी २० दवाखान्यांचे लोकार्पण करण्यात आले होते. यामध्ये आज ३४ नवीन दवाखान्यांची भर पडली आहे.
महापालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे व सहकारी सातत्याने या योजनेचा नियोजनपूर्वक विस्तार करून अधिकाधिक मुंबईकरांना त्याचा लाभ पोहोचावा, यासाठी प्रयत्नशील आहेत.
...
लाखो रुग्णांना लाभ
या दवाखान्यांच्या माध्यमातून आतापर्यंत दोन लाख ५९ हजार २३४ नागरिकांनी विविध आरोग्य सुविधांचा लाभ घेतला आहे. यापैकी दवाखान्यांमधून २ लाख ४७ हजार ५७४ रुग्णांनी मोफत वैद्यकीय तपासणी व मोफत औषधोपचार सुविधेचा लाभ घेतला आहे. पॉलिक्लिनिक व डायग्नॉस्टिक केंद्रे येथे ११ हजार ६६० रुग्णांनी दंत चिकित्सा, स्त्री-रोगतज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, जनरल फिजिशियन, त्वचारोग तज्ज्ञ अशा विविध तज्ज्ञांच्या उपचार सुविधेचा लाभ घेतला आहे.
...
मोफत, सवलतीत सेवा
या दवाखान्यांत सकाळपासून रात्रीपर्यंतच्या सेवेत मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार, किरकोळ जखमांवर मलमपट्टी यासह १४७ प्रकारच्या रक्त चाचण्यांची सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे क्ष-किरण (एक्स-रे), सोनोग्राफी इत्यादी चाचण्यांकरिता पॅनेलवरील डायग्नॉस्टिक केंद्रांद्वारे महापालिकेच्या दरात संबंधित वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्याचबरोबर विशेष तज्ज्ञांच्या सेवादेखील पॉलिक्लिनिक व डायग्नॉस्टिक सेंटरद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहेत.