
ज्येष्ठ आंबेडकरवादी लेखिका शांताबाई कांबळे यांचे निधन
मुंबई, ता. २५ ः पहिल्या दलित स्त्री लेखिका, ज्येष्ठ आंबेडकरवादी साहित्यिक शांताबाई कांबळे (वय १०१) यांचे वृद्धापकाळाने बुधवारी (ता. २५) पुण्यात निधन झाले. त्या पुण्यात त्यांच्या मुलीकडे राहत असत. त्यांच्या पार्थिवावर कोपरखैरणे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दलित पँथरचे अध्यक्ष दिवंगत प्रा. अरुण कांबळे यांच्या त्या आई होत्या.
शांताबाई कांबळे या दलित लेखिका, शिक्षिका व सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जात असत. त्यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यात महुद बुद्रुक या गावी झाला. ‘माझ्या जल्माची चित्तरकथा’ हे आत्मकथन त्या काळात वाचकप्रिय ठरले होते. याच पुस्तकावर दूरदर्शनवर ‘नाजुका’ नावाची मालिकाही आली होती. शांताबाई कांबळे यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या पुस्तकाचे अनेक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय भाषेत भाषांतर झाले.