
नद्या घेणार मोकळा श्वास
नद्या घेणार मोकळा श्वास
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : नद्यांचे पुनरुज्जीवनासाठी पालिकेने अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. मिठी,दहिसर,पोयसर नद्यांसह पर्जन्य जलवाहिन्यांचे नुतनीकरण केले जाणार आहे. यासाठी पालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात सुमारे अडीच हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. नद्यांचे रुंदीकरण, खोलीकरण, संरक्षक भिंत, मलजल प्रक्रिया केंद्र, सुशोभीकरणाचा समावेश आहे.
मिठी नदीच्या विकास आणि प्रदुषण नियंत्रणाच्या आराखड्याची अंमलबजावणी चार पॅकेजमध्ये प्रस्ताविण्यात आली आहे. यासाठी १६५४.४४ कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. तर दहिसर नदीच्या पुनरुज्जीवन कामाकरिता कार्यादेश जारी करण्यात आला असून सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. त्याचप्रकारे पोईसर नदीच्या पुनरुज्जीवन कामाकरिता कायदिश जारी करण्यात आला असून सर्वेक्षणाचे व संकल्पचित्र बनविण्याचे काम सुरू आहे. वालभट व ओशिवरा नदीच्या पुनरुज्जीवन कामाकरिताही कार्यदिश देण्यात आला आहे. २३५४८ मीटर लांबीच्या कमानी पर्जन्य जलवाहिन्यांचे ५६ घटक दुरावस्थेत असल्याचे आढळले असून त्यापैकी १४२८५ मीटर लांबीच्या २७ घटकांचे पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी अत्यंत तातडीने पुनर्वसन करणे आवश्यक आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात, आय. आय. टी. बॉम्बे आणि व्ही.जे.टी.आय. यांच्या सल्ल्यानुसार जिओपॉलि तंत्रज्ञानाचा वापर करुन कमान पर्जन्य जलवाहिन्यांच्या २७ घटकांचे पुनर्वसन करण्याचे पर्जन्य जलवाहिन्या खात्याने प्रस्ताविले आहे.या कामाच्या अंमलबजावणीसाठी कंत्राटदारांची नियुक्त करण्याकरिता निविदा मागविण्यात आल्या आहेत. कामाचा अंदाजित खर्च २४१५.२८ कोटी इतका आहे. कामाचा कालावधी ३६ महिने आहे.