
जेईई मेनचा निकाल जाहीर
मुंबई, ता. ७ : देशातील आयआयटी आणि इतर संस्थांमध्ये बीटेक, बीआर्च, बी प्लॅन आदी प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या जेईई मेनच्या पहिल्या सत्राचा निकाल जाहीर झाला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने ही परीक्षा घेतली होती. देशातील २० विद्यार्थ्यांना या परीक्षेत १०० पर्सेंटाईल मिळाले आहेत. चंद्रपूर येथील ज्ञानेश शिंदे १०० पर्सेंटाईलसह देशातील टाॅप २० विद्यार्थ्यांमध्ये झळकला आहे. तसेच त्याने राज्यातून प्रथम येण्याचा मानही पटकावला आहे.
यंदा १०० पर्सेंटाईल मिळवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुली मागे राहिल्या असल्या तरी इतर देशातील दोन विद्यार्थिनींनी या परीक्षेत ९९.९९ पर्सेंटाईल मिळवले आहेत. देशात टॉपर ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अभिनीत मॅजेती, अमोघ जालन, अपूर्वा समोटा, आशिक स्टेनी, बिक्किना चौधरी, देशंक सिंह, ध्रुव जैन आणि राज्यातील ज्ञानेश शिंदे आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जेईई मेनचे दुसरे सत्र ६, ८, १० ते १२ एप्रिलदम्यान होणार आहे. या सत्रासाठी लगेच नोंदणी सुरू झाली असून त्यासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना ७ मार्चपर्यंत नोंदणी करता येईल.
...
सर्वाधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी
यंदा जेईई मेन परीक्षेसाठी सर्वाधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. नोंदणी केलेल्या ८.६० लाख विद्यार्थ्यांपैकी ८ लाख २३ हजार ९६७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यांपैकी २ लाख ४३ हजार ९२८ मुली; तर ५ लाख ८० हदार ३७ मुले होती, तर २ ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचा समावेश होता. १०० पर्सेंटाईल मिळालेल्या २० विद्यार्थ्यांमध्ये १४ जण सर्वसाधारण गटातील, ४ ओबीसी-एनसीए आणि प्रत्येकी एक सर्वसाधारण ईडब्ल्यूएस आणि एससी प्रवर्गातील आहे. मुलींमध्ये मीसला प्राणथी श्रीजा हिने ९९.९९७ पर्सेंटाईलसह देशात मुलींमध्ये पहिले स्थान पटकावले आहे, तर रामिरेड्डी मेघना ९९.९९४ पर्सेंटाईलसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
...
महाराष्ट्रातील एक लाख सहा हजार विद्यार्थी
यंदा एकूण ८.६ लाख उमेदवारांनी पेपर एक; तर ०.४६ लाख उमेदवारांनी पेपर दोनसाठी नोंदणी केली आहे. यंदा जेईई मेनच्या पहिल्या सत्रासाठी एकूण उपस्थिती ९५.७९ टक्के होती. परीक्षा एजन्सीने जेईई प्रवेश परीक्षा सुरू केल्यापासूनची सर्वाधिक उपस्थिती यंदाच्या परीक्षेला होती. यंदा महाराष्ट्रातून परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही सर्वाधिक होती. महाराष्ट्रातील एक लाख सहा हजार विद्यार्थ्यांनी जेईई मेनसाठी नोंदणी केली होती. यात ७२ हजार १२ मुले तर ३४ हजार ९३ मुली होत्या.
...
आयआयटीचे स्वप्न
ज्ञानेश शिंदे याचे आई-वडील हे मूळचे पुण्याचे असले, तरी शिंदे यांचे बालपण, शालेय शिक्षण हे चंद्रपूर येथेच झाले. शालेय शिक्षण तेथेच पूर्ण झाल्याने ते तेथील रहिवासी झाले आहेत. ज्ञानेश याला आयआयटी मुंबई सीएस शाखेतून बीटेक करायचे असून त्यासाठी तो जेईई अडव्हांसची तयारी करत आहे.