
दाभोलकर प्रकरणाचा खटला तीन महिन्यात पूर्ण होईल!
मुंबई, ता. ७ : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा खटला येत्या दोन ते तीन महिन्यांत पूर्ण होईल, अशी माहिती सीबीआयने आज मुंबई उच्च न्यायालयात दिली. दाभोलकर यांची हत्या सन २०१३ मध्ये पुण्यात झाली होती.
या खटल्यातील प्रमुख आरोपी विरेंद्र सिंह तावडेने न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. खटला पूर्ण व्हायला अद्याप अवधी आहे. त्यामुळे जामीन मंजूर करावा, अशी मागणी याचिकेत केली आहे; परंतु सीबीआयने या जामिनाला विरोध केला आहे. आतापर्यंत पुणे सत्र न्यायालयाने १५ साक्षीदारांचा जबाब नोंदवला आहे. आणखी सात ते आठ साक्षीदार बोलवण्यात येणार आहेत. खटला जलदगतीने चालल्यास दोन ते तीन महिन्यात तो पूर्ण होईल, अशी माहिती तेथील मुख्य सरकारी वकिलांनी दिली आहे, असे सीबीआयच्या वतीने ॲड. संदेश पाटील यांनी सांगितले. यामध्ये एकही साक्षीदार फितूर झालेला नाही, असेही या वेळी सांगण्यात आले. न्या. अजय गडकरी आणि न्या. पी. डी. नाईक यांच्या खंडपीठाने पुढील सुनावणी २१ फेब्रुवारीला निश्चित केली आहे.