यंदा ‘तुंबई’तून मुंबईकरांची सुटका? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यंदा ‘तुंबई’तून मुंबईकरांची सुटका? १०४ कामे पूर्ण,४३ प्रगतिपथावर
यंदा ‘तुंबई’तून मुंबईकरांची सुटका?

यंदा ‘तुंबई’तून मुंबईकरांची सुटका? १०४ कामे पूर्ण,४३ प्रगतिपथावर

मुंबई : मुंबईची मलनि:सारण व्यवस्था अधिक सुधारावी, यासाठी पालिका प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई मलनि:सारण सुधारणा कार्यक्रम (एमएसआयपी) आखण्यात आला असून त्यानुसार शहर आणि उपनगरांत विविध ठिकाणी कामे सुरू आहेत. आतापर्यंत १०४ कामे पूर्ण झाली असून ४३ प्रगतिपथावर आहेत. नऊ कामे लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर पावसाळ्यात दरवर्षी रस्त्यावर साचणाऱ्या पाण्यातून मुंबईकरांची काही प्रमाणात सुटका होणार आहे.

महापालिका मुंबईकरांना १०० टक्के मलनिःसारण वाहिन्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. सध्या २०४५.६३ किमी लांबीचे मलनि:सारण वाहिन्यांचे जाळे कार्यान्वित आहे. त्याद्वारे मुंबईच्या एकूण ७४.९८ टक्के लोकसंख्येला आणि ८४.६७ टक्के क्षेत्रफळाला मलनि:सारण सुविधा पुरवली जात आहे. २०१६-१७ पासून मुबई मलनि:सारण सुधारणा कार्यक्रमाला (एमएसआयपी) सुरुवात करण्यात आली. महापालिकेचे रस्ते आणि विद्यमान विकसित डीपी रस्त्यांवर ९३.६८ किमी लांबीच्या मलनि:सारण वाहिन्या टाकणे, त्यांचे आकारमान वाढविणे इत्यादी कामे करण्यात येणार आहेत.

अविकसित रस्त्यांलगत १४३.१९ किमी लांबीच्या मलनि:सारण वाहिन्यांपैकी घटक २ मध्ये नियोजित केल्याप्रमाणे, ७.४० किमी लांबीची सुमारे सहा कामे पूर्ण झालेली आहेत. ५.१३ किमी लांबीची १३ कामे प्रगतिपथावर आहेत. २५.२७ किमी लांबीच्या ३९ कामांची निविदा प्रक्रिया सुरू आहे. त्याव्यतिरिक्त ९.३९ किमी लांबीच्या मलनि:सारण वाहिन्यांचे आकारमान वाढवणारी सात कामे महापालिकेद्वारे हाती घेण्यात आली आहेत. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये अंदाजे १५ किमी लांबीची २३ नवीन कामे प्रस्तावित आहेत.

महापालिकेच्या हद्दीमधील प्रमुख नाल्यांमधून येणारा बिनपावसाळी प्रवाह खाडी-समुद्राच्या प्रदूषणास कारणीभूत ठरत आहे. तो प्रवाह वळवण्याकरिता कृती आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराच्या नियुक्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. विकास आराखडा तयार करण्याच्या रूपरेषेनुसार पूर्व उपनगरातील शीतल तलाव, शहरातील सायन तलाव आणि पश्चिम उपनगरातील डिगेश्वर तलावांचे पुनरुज्जीवन करण्याची आणि तलावांमध्ये येणारा बिनपावसाळी प्रवाह वळविण्याची कामे पथदर्शी प्रकल्प म्हणून हाती घेण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्याचे काम सुरू आहे.

आतापर्यंतची प्रगती
- ४५.७९ किमी लांबीची १०४ कामे पूर्ण
- २८.१७ किमी लांबीची ४३ कामे प्रगतिपथावर
- १९.७२ किमी लांबीच्या नऊ कामांना लवकरच सुरुवात

प्रस्तावित कामे
- २०२३ २४ मध्ये शहर, पूर्व व पश्चिम उपनगरातील विविध नाले, त्यांचे उपनाले, तलाव आणि जलस्थळांमध्ये प्रवाहित होणाऱ्या बिनपावसाळी प्रवाहास अटकाव करून तो मलनिःसारण प्रक्रिया केंद्रामध्ये वळविणे
- म्हाडा व सरकारी वसाहतीमधील मलनि:सारण वाहिन्यांच्या जाळ्यांमध्ये सुधारणा करणे किंवा त्या नव्याने टाकणे
- सूक्ष्म बोगदा पद्धतीद्वारे भांडुप उदंचन केंद्रापासून हरी ओम नगर आणि कन्नमवार नगरपर्यंत अनुक्रमे ४.२६ किमी व ५.३९ किमी लांबीची मलनि:सारण वाहिनी टाकणे
- चिंबई उदंचन केंद्र ते आई आणि मुलगा पुतळा (वांद्रे पश्चिम) दरम्यान ४.४७ किमी लांबीची मलनिःसारण वाहिनी टाकणे

अर्थसंकल्पात भरीव तरतूद
मुंबईची मलनि:सारण व्यवस्था अधिक सुधारावी यासाठी पालिकेने अर्थसंकल्पात भरीव तरतूदही केली आहे. एकूण मलनि:सारण प्रकल्प विभागासाठी २०२२-२३ च्या सुधारित अंदाजात २३३९.९० कोटी आणि २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजात २८५९.०२ कोटी इतकी तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.

टॅग्स :Mumbai